आदिशक्तीचा जागर | शारदीय नवरात्र 2023 | Sharadiya Navratra 2023
"जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ।।"
आदिशक्तीचा जागर | शारदीय नवरात्र 2023 | Sharadiya Navratra 2023
मुल जेव्हा जन्माला येते त्यानंतर ते जेव्हा बोलायला सुरुवात करतं तेव्हा शक्यतो पहिला शब्द 'आई' म्हणते. अश्याच आई भगवतीच्या सेवेचे पंचवार्षिक व्रत पुर्ण करण्याचा संकल्प मी केला आहे. त्याची सुरुवात कशी झाली? व कलकत्ता येथील जगप्रसिद्ध दुर्गापुजेचा अनुभव ह्याबद्दल मी आज आपणाशी बोलणार आहे.
आपल्या भारत देशात विविधतेत एकात्मता आहे, हे आपण जाणतोच. अनेक सण मोठ्या जल्लोषात व उत्साहपुर्वक वातावरणांत आपल्याकडे साजरे केले जातात.
अश्याच प्रकारे गणेशोत्सव झाल्यानंतर आपल्याला वेध लागतात, ते शारदीय नवरात्र उत्सवाचे. गणपती उत्सवानंतर १५ दिवस पितृ-पक्ष पुर्ण होत असतानांच आपल्या प्रत्येकाच्या घरी नवरात्र उत्सवाची तयारी सुरु असते.
Adishakti |
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महिषासुरमर्दिनी, चंड-मुंड नाशिनी, दुर्गा, चंद्रघंटा, शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, कुष्मांडा, स्कंदमाता, सिद्धीदात्री, कात्यायनी, वैष्णवी, पद्मलोचिनी, अष्टभुजा, महागौरी अश्या अनेक रुपांत आपण भगवतीची आराधना करतो.
खरं तर शास्त्राप्रमाणे आपल्याकडे चैत्र, वासंतिक नवरात्र, आषाढ नवरात्र, शारदीय नवरात्र साजरे होत असतात. मात्र, शारदीय नवरात्रिचे महत्व / shardiiya navratra.
शारदीय नवरात्र उत्सव ह्यांत मोठ्या प्रमाणावर घरोघरी साजरा होतो. अश्विन मास सुरु होतांच प्रतिपदेला घटस्थापना करुन ९ दिवस आदिशक्तिचं पुजन केलं जातं. शुंभ-निशुंभ, चंड-मुंड, रक्तबीज ह्यासह अनेक राक्षसाचा संहार केल्याने देवी ह्या काळांत विश्रांती घेत असते.
शरद ऋतुच्या प्रारंभी हा उत्सव येत असल्याने ह्यांस शारदीय नवरात्र म्हटले जाते.
मी देखील ह्या प्रमाणे कुठल्या तरी रुपांत तिच्या चरणी माझी भक्तिमय सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न आजवर करत आलो आहे. काही वर्ष तर अगदी दिवसभर फक्त एक फळ खाऊन उपवास करणे, ९ दिवस चप्पल न घालणे, गादीवर न झोपणे देवी माहात्म्य वाचन करणे. असे नियम करुन मी हे व्रत केले आहे. एक वर्षी तर वणीच्या गडावर जाऊन तिथुन पेटती ज्योत घेऊन अनवाणी पायी चालत-चालत घरापर्यंत येण्याचेही मनोधैर्य देवीने मला दिले आहे.
पौरोहित्यामुळे अनेक ठिकाणी मी पुजेसाठी जात असतो. ह्यामुळे अनेक ठिकाणी बर्याच ओळखी झाल्या आहेत. काही जण तर मला अगदी त्यांच्या घरांतील सदस्यच मानतात. एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही सहभागी होत असतो.
देवकार्य म्हटल्यावर यजमानाबरोबरच मलाही प्रसन्नता,आत्मिक समाधान लाभतं. अश्यापैकीच एक असणारे माझ्या घराजवळच राहणार्या प्रभु यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासुन मी अनेकदा पुजेसाठी जात असतो. प्रभु साहेब, वहिनी, निखिल, नविन असे सगळेच ह्या पुजेसाठी खुप मनोवेधक व नयनरम्य तयारी करतात. एकदा श्रावण महिन्यांतील पुजेसाठी त्यांच्याकडे गेलो असता बोलण्याच्या ओघांत सहजच त्यांनी मला सांगितलं कि आमच्याकडे गणपती बसवत नाही, परंतु नवरात्रांत आम्ही खुप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करत असतो. त्याचे फोटोदेखील त्यांनी मला दाखवले.
ते वर्णन ऐकुन, फोटो बघुन मी सहजच त्यांना म्हणालो कि,
"मी सुद्धा येणार ह्यावर्षी पासुन नवरात्रांत तुमच्याकडे......"
कारण, मला असे धार्मिक कार्याचे आयोजन फार आवडतं. त्यामुळेच तर दरवर्षी गौरी-गणपती उत्सवांत मी माझ्या घरी वेगवेगळे देखावे बनवत असतो. परमेश्वर कल्पनाशक्तीला कृतीची जोड देऊन ही सेवा करवुन घेतो हे तितकचं खरं आहे.
ठरल्याप्रमाणे प्रभु साहेब व वहिनी मला म्हणाल्या.
"गुरुजी, आम्ही दररोजच्या आरतीसाठी अनेक नातेवाईक, मित्र,परिवार, शेजारी यांना बोलवत असतो. तुम्हीसुद्धा आमच्याच परिवारांतील एक सदस्य आहात, तर मग ९ दिवसांत केव्हातरी एकदा आपण तुमच्याच कडुन देवीची आरती करत जाऊ."
हा जणु जगदंबेचाच आदेश असावा. मी तत्काळ होकार दिला.
त्याच वर्षी घटस्थापनेनंतर ज्या दिवशी त्यांनी मला संध्याकाळच्या आरतीसाठी बोलावलं, तेव्हा तिथलं प्रसन्न, आनंदी, उत्साही वातावरण बघुन मी भारावुन गेलो. प्रभुंच्या घरच्या मंडळी बरोबरच अनेक नातेवाईक, मित्र, शेजारी हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अगदी ताला सुरांत देवीची भजनं म्हणुन वातावरणांत नवचैतन्य संचरलं आहे. वहिनी स्वतः दररोज प्रसादाचे विविध पदार्थ बनवुन सगळ्यांना तृप्त करतात. आलेल्या सगळ्या सुवासिनींची खण-नारळाने ओटी भरली जाते.
पुरुष, स्त्रिया, बालगोपाल, वृद्ध सगळेच ह्या वातावरणांत तल्लीन होऊन जातात. मला हा सोहळा खुपच मनात भरला. आमच्या घरी कुलाचाराप्रमाणे घटस्थापना असतेच. पण आपणही आपल्या घरी किमान ५ वर्ष तरी देवीची मुर्ती स्थापन करावी असा त्या आदिशक्तीपुढे मी त्यावेळी संकल्पच केला.
त्यानंतर २-३ वर्ष मी दर नवरात्रांत त्यांच्याकडे जातच असायचो. मात्र, आपल्या घरी कधी ह्या व्रताची सुरुवात करावी? असा प्रश्न मनात होताच. परंतु,योग्य वेळ आली कि देवी माझ्याकडुन हि सेवा, हे व्रत, संकल्प पुर्ण करवुन घेणार अशी विश्वासरुपी ज्योत माझ्या मनांत अखंडपणे तेवत होती. हा मनोनिग्रह, ध्यास मी अजिबात सोडला नाही.
त्याचप्रमाणे एकदा खास नवरात्रांत दुर्गापुजेसाठी कलकत्ता जाण्याची माझी मनस्वी इच्छा होती. व अखेरीस हे दोन्ही योगायोग भगवतीने जुळवुन आणले.
माझा नाशिकरोडला राहणारा मित्र स्वप्नील याला त्याच्या स्वतःच्या घरी गौरी(महालक्ष्मी) बसविण्याची इच्छा होती. परंतु,आपल्याकडुन हे व्रत कसं होणार? कोण माहिती देणार? म्हणुन तो साशंक होता.
मी म्हटलं."अरे तुझी महत्त्वकांक्षा आहे, तर तु सुरुवात कर. आम्ही काय लागेल ती मदत करु."
त्यामुळे,त्याचाही उत्साह वाढला. एप्रिल २०१८ मध्ये आम्ही स्वप्नीलसाठी महालक्ष्मीचे मुखवटे घेतले. त्याला संपुर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी नकळतपणे देवीने मला दिली. गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर अगदी विधिवतपणे जेष्ठा-कनिष्ठा स्वप्नीलच्या घरी विराजमान झाल्या. त्याची अनेक वर्षांची मनोकामना पुर्ण झाली.
त्यानंतर असंच एकदा आमचं फोनवर बोलणं सुरु असतांना स्वप्नील मला म्हणाला,
"पंकज मला हे महालक्ष्मीचे मुखवटे कोल्हापुरला देवीच्या भेटीसाठी नेण्याची इच्छा आहे."
मी बोललो. "अरे,आपण नक्कीच हे मुखवटे कोल्हापुरला घेऊन जाऊ." पाडव्या नंतर काही दिवसांनीच मी आमच्या घरी नवचंडीपुजन करायचं ठरवलं होतं. त्यापुर्वी हे कार्य सिद्धीस जाण्यासाठी महालक्ष्मीचा आशिर्वाद घ्यायला जावं असं माझ्यादेखील मनात होतंच. कारण,करविर निवासिनी अंबाबाई आमची कुलदेवता आहे. आई, पप्पा अथवा मी असे किमान वर्षभरांत एकदा तरी कोल्हापुरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असतोच. स्वप्नीलशी ह्याबद्दल बोलुन प्रवास नियोजन करुन अवघ्या ५-६ दिवसांतच आम्ही कोल्हापुरला गेलो.
शुक्रवार असुन त्या दिवशी अंबाबाईचं दर्शन घेवुन मुनीश्वर गुरुजींकडुन अभिषेक पुजा करुन ठरवलेलं कार्य व्यवस्थित पार पाडण्याचं सामर्थ्य दे .अशी मी देवीला मनोभावे प्रार्थना केली.
घरी नवचंडी पुजेच्या वेळी देवी स्थापित करायला मुखवटा हवा म्हणुन मुख्य मंदिराच्या पश्चिम महाद्वाराजवळ मी व स्वप्नील शोधाशोध करत असतांनाच साक्षातः कोल्हापुरच्याच देवीची प्रतिकृती असलेला मुखवटा आम्हांला मिळाला. कदाचित, आई जगदंबाच माझ्या घरी येणार असं त्यावेळी मनात आलं. पुढे जेजुरी, पंढरपुर, सज्जनगड असा प्रवास करुन घरी आल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी घरी नवचंडीपुजन झालं.
त्यावेळी, चौरंगावर विराजमान कोल्हापुर निवासिनीची भावमुद्रा अत्यंत मोहक, आनंदी, प्रसन्नचित् दिसत होती. आमच्या सजगुरे मामाने व सगळ्या पुरोहित मंडळींनी अगदी यथासांग, विधीवत हि नवचंडी पुजा करुन आशिर्वादासोबतच समाधानाचं, सौख्याचं, समृद्धीचं माप आमच्या सगळ्या कुटुंबाच्या पदरी दिलं. हा सुखसोहळा पुर्ण होतांना माझे ओघळते आनंदाश्रु आई भवानी टिपत होती. त्याच दिवशी आम्ही जागरण-गोंधळाचाही कार्यक्रम केला.
नवचंडी पुजा संपन्न झाल्यानंतर अवघ्या दिड महिन्यांतच देवीने मला आनंदाचा आणखी एक दैवी संकेत दिला. माझ्या वहिनीची ओटी जगत् मातेने भरली होती. आमच्या घरांत नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल लागली होती.
वहिनींनी ज्यावेळी ही बातमी मला सांगितली, अगदी त्याच क्षणी मी ठरवलं कि ह्या वर्षीपासुन घरी नवरात्रांत देवीची स्थापना करायची.
व सुरुवात करविर निवासिनी कुलदेवता महालक्ष्मीपासुन करायची. पहिल्या वर्षी महालक्ष्मी, त्यानंतर तुळजाभवानी, माहुरची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी व नंतर दुर्गा देवी अशी प्रत्येक वर्षी एक-एक करत प्रभुंच्या घरी बोललेल्या संकल्पाची परिपुर्ती करायची.
म्हणजे देवीची साडेतीन शक्तीपीठ आपल्या घरी येतील.
"कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता।
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।
तुलजापुरं तृतीय स्यात् सप्तशृंग तथैव च ।।"
त्याप्रमाणे,२०१८ पासुन ह्या संकल्प व्रताची सुरुवात झाली. नवरात्रांत महालक्ष्मी स्थापित करुन, घटस्थापना केल्यानंतर ज्यावेळी मी आरती करत होतो, तेव्हा अगदी कोल्हापुरच्या मंदिरांत असल्यासारखंच वाटलं. त्याच वर्षी घरी कुंकुम अर्चन पुजन करावं असा मनोदय होता. मात्र, त्यावेळी माझी मोठी आत्या खुपच आजारी होती. त्यामुळे,मन चलबिचल होतं. अखेरीस,पुढच्या वर्षी बघु म्हणुन मी तो कुंकुम अर्चन विधी कार्यक्रम रद्द केला. नवरात्र पार झालेत.व कोजागिरी पोर्णिमेनंतर अवघ्या २ दिवसांनी माझ्या आत्याने ह्या जगाचा निरोप घेतला.
घरांत येणार्या लहानश्या पाहुण्यासाठी दिवसागणिक आमची सगळ्यांची मन आतुर होती. दादा-वहिनीने तर बाळाच्या नामकरणाची जबाबदारी मला प्रदान केली होती. यशावकाश नवमास पुर्ण होतांच रंगपंचमीच्या दुसर्या दिवशी षष्ठी तिथीला व कर्म,धर्म संयोगाने मंगळवारी (२६ मार्च २०१९) आमच्याकडे आनंदोत्सव साजरा झाला. दादा-वहिनीला कन्यारत्न प्राप्ती झाली.
अगोदरच ठरल्याप्रमाणे नामकरण करण्यासाठी मी अनेक नावं शोधु लागलो. मला बाळाचं नाव असं ठेवायचं होतं, जे शक्यतो नातेवाईक, शेजारी, मित्र परिवारांत प्रचलित नसेल.
बारश्याच्या कार्यक्रमापुर्वी असंच एक दिवस रोजची नित्योपसना करत असतांना मला बाळाचं नाव सुचलं. नवचंडी पुजेनंतर अवघ्या काही दिवसांतच वहिनी गर्भवती होत्या. व योगायोगाने आमच्याकडे कन्यारत्नच झाल्याने देवीच्या एका श्लोकातील नाव माझ्या मनात पक्क ठरलं. विशेष म्हणजे त्यांत दादा-वहिनींच्या नावाची अक्षरंही आली. म्हणुनच, संदेश मधील 'श' रविना मधील 'र' व संदेश-रविनाची कन्या असं म्हणुन बाळाचं "शरण्या" असं आम्ही नामकरण केलं.
मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये घरी तुळजाभवानीची स्थापना केली. नवरात्राच्या दुसर्या माळेला सुमारे २५ सुवासिनी व ५ कुमारिका आल्या होत्या. त्यांनी श्रीसुक्ताचे आर्वतनं करुन कुंकुमअर्चन पुजा पुर्ण केली. भजनावलीने घराचा संपुर्ण परिसर निनादला. जणु,त्या सगळ्या नारी शक्तीच्या रुपात जगत् जननीच मला आशिर्वाद देऊन गेली असं म्हणायला हरकत नाही.
२०१९ मध्येच कलकत्ता ह्याठिकाणी दुर्गा पुजेला जाण्याचा योग जुळुन आला. त्याची सुद्धा एक अतिशय रंजक कहानी आहे. खरं तर आजवर मी बहुतांश ठिकाणी एकट्यानेच प्रवास केला आहे.परंतु, दुर्गा पुजा म्हटल्यानंतर प्रचंड गर्दी असणार.
त्यामुळे तिकडे जाणार कसं ? रहायचं कुठे ? असे प्रश्न माझ्यासमोर होते. मात्र, त्याचीसुद्धा उत्तरं अगदी सहजच मिळाली.
जुलै २०१७ मध्ये मी बनारसला गेलो होतो. त्यावेळी, दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीचा अनुपम्य सोहळा बघत असतांनाच माझ्या शेजारी बसलेल्या प्रशांत व जय ह्या कलकत्त्याहुन आलेल्या मुलांशी माझी ओळख झाली.ते दोघं भाऊ उत्तर प्रदेश पोलिसच्या परिक्षेसाठी आलेले होते.अगदी,थोडाच वेळ आम्ही सोबत होतो.परंतु,परिचय अगदी पुर्वापार असल्याप्रमाणे एकमेकांशी गप्पा झाल्या.गंगा आरतीनंतर आम्ही परत आपआपल्या निवासस्थानी आलो.
पण,कुणास ठाऊक????
"तेरा मुझसे है पहले का नाता कोई......"
ह्या ओळींप्रमाणे प्रशांत व जयने काही दिवसांनी मला Facebook वर Search केलं. अगोदर आम्ही Facebook Friend झालो. त्यानंतर एकमेकांचे नंबर्स शेअर झाले. बोलणं वाढलं, तशी आमची मैत्री बहरत गेली.
त्यावेळी मी प्रशांतला म्हणालो कि,
"भाई एक बार में नवरात्री में दुर्गा पुजा के लिए कोलकाता आना चाहता हुँ."
मी अगदी सहजच बोलुन गेलो. परंतु प्रशांतने हि गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवली होती. मागील वर्षी त्याने माझं रेल्वेचं बुकींग करुन मला दुर्गा पुजेसाठी आमंत्रितही केलं. हा माझ्याकरिता सुखद धक्का होता. मग काय? बॅग भरो अन् निकल पडो ह्याप्रमाणे मी कलकत्त्याला पोहचलो. मात्र, प्रशांतला मी सांगितलं कि कलकत्ता शहरांतील सगळा प्रवास मी स्वतः करणार. कारण, त्यामुळे मला शहराची सविस्तर माहिती होईल. त्याप्रमाणे हावडा जंक्शनला उतरल्यानंतर मी शोध-तपास करत, विचारपुस करत स्वतःच बेलुर मठला पोहचलो.
प्रशांतने माझी ३ दिवस राहण्याची व्यवस्था बेलुर मठांतच केली होती. बेलुर मठांत स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, शारदा माता यांचे स्थान आहे. अतिशय भव्य अश्या परिसरांत हे ठिकाण आहे.मी कलकत्त्याला चतुर्थीला पोहचलो.तिकडे कलकत्त्याला पंचमी पासुन दुर्गा पुजा उत्सव सुरु होतो. बेलुर मठांतील प्रसन्न वातावरणामुळे माझा २ दिवसाच्या प्रवसाचा शीण क्षणार्धात नाहिसा झाला.
पंचमी पासुन दुर्गा पुजा महोत्सवाचा साक्षीदार होतांना मला होणारा आनंद अवर्णनीय होता. हि पुजा कशी करतात? त्याचे महत्त्व काय? हे सगळं मी तिथल्या लोकांना विस्तृतपणे विचारलं. दुपारनंतर ५१ शक्तीपिठापैकी १ दक्षिणेश्वर काली मंदीरांत गेलो. बेलुर मठापासुन हा प्रवास होडीने करतांना निसर्गाची साद माझा आनंद खुलवत होती. ब्रिटिश कालीन हावडा ब्रिज, काली माता मंदीर, व्हिक्टोरिया मेमोरियल अश्या अनेक स्थळांना भेटी दिल्या. मेट्रोने स्वतः प्रवास केला. कलकत्त्याच्या रत्त्यावर धावणार्या रेल्वेमध्ये म्हणजेच ट्राम्पमध्ये प्रवास करतांना जणु मी ऐतिहासिक काळात आहे असं जाणवलं.
Durga Pooja |
त्यानंतर प्रशांत सोबत अनेक ठिकाणच्या दुर्गापुजा पंडालमध्ये फिरलो. महाराष्ट्रात जसे गणपती उत्सवाचे देखावे असतात, त्याप्रमाणे नवरात्रांत दुर्गा पुजेचे भव्य मंडप उभारुन देखावे तयार केले जातात. ह्या मंडपांनाच पंडाल म्हणतात. अतिशय नयनरम्य, मोहक, स्वर्गसुखाची अनुभुती देणारी दुर्गा पुजा व पंडाल मला प्रशांतमुळे बघायला मिळाले. कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध रसगुल्ला मिठाईचा मनसोक्त आस्वाद घेतला. मला कधी स्वप्नांतही वाटलं नव्हतं कि बनारसला गंगा आरतीला काही क्षण भेट झालेल्या प्रशांतमुळे मला हे अनुभवता येईल. प्रशांतची व माझी मैत्री ह्या भेटीमुळे अधिकच घट्ट झाली.
परतीच्या प्रवासांत रेल्वेत माझ्या शेजारी असलेल्या सहप्रवाशी मनिषा, प्रियंका ,गोपाल व त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा करत करत मी कलकत्त्याहुन नाशिकला कधी पोहचलो हे समजलं सुद्धा नाही. मनिषा,प्रियंका हे सगळे मुळचे कलकत्त्याचे राहणारे आहेत. मुंबईला फिरायला आले होते. प्रवासांत दिलखुलास गप्पा होत असतांनाच त्यांनी माझ्याकडुन मुंबई, शिर्डी, नाशिक ह्याठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेतली.
एवढचं काय तर ते मुंबईहुन नाशिकला आल्यानंतर त्र्यंबकेश्वरला जात असतांना ते सगळे माझ्या घरी येऊन सगळ्यांना भेटुनही गेले. ह्या प्रवासामुळे ह्या कुटुंबाशी घनिष्ठ ओळख झाली. मनिषा, प्रियंकाला भाऊ नसल्याने मला त्या त्यांचा भाऊच मानतात. अतिशोयक्ती वाटेल परंतु ह्यावर्षी प्रियंकाने मला रक्षाबंधनला राखीसुद्धा पाठवली. सतत आमचं फोनवर बोलणं होत असतं.
कसे जुळतात ना हे ऋनानुबंध?????
अगदी अपरिचित असलेली व्यक्ती सुद्धा क्षणिक सहवासाने आपल्या आयुष्याला नवा अर्थ देऊन जाते. जिव्हाळा, आपुलकीचं नवं वलय आपल्या आयुष्यात निर्माण करते. माणुसकीची संपत्ती ह्यालाच तर म्हणतात.
यंदा म्हणजेच २०२० मध्ये आमच्याकडील नवरात्राचे ३ रे वर्ष असल्याने माहुरच्या रेणुका मातेची स्थापना करायची होती. मात्र,कोरोनामुळे कुठेच मनासारखी मुर्ती मिळेना. बरीच शोधाशोध केली. सगळीकडे नकारच मिळत होता. पण,हट्ट केला तर तो पुर्ण करायचाच हाच माझा मानस असतो.
मी रेणुका मातेला सांगितलं......
"आई तुझ्या लेकराचा संकल्प खंडित होता कामा नये."
"अनाथांसी अंबे नको विसरु हो,
भवसागरी सांग कैसा तरु हो,
अन्यायी मी हे तुझे लेकरु हो,
नको रेणुके दैन्य माझे करु वो ।"
अशी देवीची मनोभावे प्रार्थना केली.
अचानक, मला भालेराव काकुंचा फोन आला तर त्या म्हणाल्या कि माझी एक मैत्रिण आहे, त्यांनी २ वर्षापुर्वी स्वतः घरी माहुरची रेणुका देवीची मुर्ती बनवली आहे. त्याचे फोटोदेखील मला Whatsapp वर पाठवले. मी आरती कुलकर्णी काकुंकडे त्यांच्या घरी जाऊन ती मुर्ती बघुनही आलो. अतिशय सुबक, हुबेहुब रेणुका मातेची मुर्ती त्यांनी घरी बनवलेली आहे. त्या काकु मला हेदेखील म्हणाल्यात कि, "भगवत कृपेने मुर्ती घडली गेली, आम्ही मात्र निमित्त मात्र ठरलो."
पण,ह्यांत अडचण अशी होती कि ती मुर्ती आणायला अतिशय वजनदार, भव्य असुन माझं घर लहान असल्याने त्याची स्शापना कुठे करायची?
पण, मी सतत मनात आई रेणुकेचा धावा करत होतो.
"माते एक विरे त्वरामय करे,
दे तु दयासागरे,
माझा हेतु पुरे,मनात न उरे,
संदेह माझा हरे ।।"
तु यायलाच पाहिजे असा हट्ट देवीकडे करत होतो. माझे मित्र ऋषीकेश, हनुमंत, स्वप्नील, मोहिनी ताई असे सगळे मला सांगत होते, तुझी संकल्पपुर्ती नक्की होणार. जणु ह्या सगळ्यांच्या बोलण्यांतुन मला पाठबळ मिळत होतं. विशेष म्हणजे ह्या सगळ्या चर्चा, शोधमोहिम, आरती काकुंकडुन देवीचे फोटो येणं हे सगळं मंगळवार, शुक्रवार ह्यांच दिवशी घडत होतं. अखेरीस, सुनील ह्या माझ्या मित्राच्या ओळखींतुन मला रेणुका देवीची मुर्ती मिळाली.
अगदी मनासारखी........
अहो! आश्चर्य म्हणजे ती मुर्ती मी घरी आणली तो वार देखील मंगळवार होता. देवी आणली व ज्यावेळी मी तिचा शृंगार केला व घटस्थापना केली, तेव्हा सगळा घटनाक्रम आठवुन मनात विचार आला.अंतिमतः माय-माऊली, आदिमायेने माझा हट्ट पुर्ण केलाच.
ती फक्त मला संकेत देत होती कि,
"मी येणार, फक्त तु तुझी चिकाटी, विश्वास डळमळीत होऊ देवु नकोस."
अश्या प्रकारे शारदीय नवरात्राचे म्हणता-म्हणता ३ वर्ष पुर्ण झालेत. हि तिचीच कृपा, आशिर्वाद म्हणायला हवा. अजुनही दरवर्षी प्रभु साहेबांकडे नवरात्रांत एक दिवस मी देवीच्या आरतीसाठी जात आहे. ते मला आर्वजुन बोलवतात. ह्याच संकल्पाचे पुढचे उर्वरीत २ वर्ष पुर्ण करुन जगद् माता तिचं कृपाछत्र कायम माझ्यावर ठेवणार ह्यांत शंकाच नाही. अश्याच प्रकारे भगवतीने माझ्याकडुन सेवा करुन घ्यावी हिच विनवणी आहे.
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।"
श्री जगदंबार्पणमस्तु ।।
धन्यवाद 'आदिशक्तीचा जागर | शारदीय नवरात्र 2023 | Sharadiya Navratra 2023' वाचल्याबद्दल!! लेखन: पंकज पाठक.(नाशिक)