राजमाता जिजाऊ जयंती विशेष | Rajmata Jijau Jayanti - 12 January 2024
नमस्कार मित्रांनो,
राजमाता जिजाऊ जयंती विशेष | Rajmata Jijau Jayanti - 12 January 2024 जिजाऊ माता माहिती मराठी
जेव्हा मोघली आणि इतर अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थयथया नाचत होत्या, दिवसाढवळ्या आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात होते, एवढंच काय तर एखाद्याची मयत नेताना कोणी मोठ्यानं “ जय राम श्रीराम " देखील बोलू शकत नव्हतं, त्यावेळेस पारतंत्र्याच्या या साखळदंडांवरती तलवारीने घणाघात करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जन्म माँ जिजाऊ यांच्या कुशीत झाला. जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी माँसाहेब जिजाऊंनी बघितलं ते शिवरायांनी सत्यात उतरवलं. अगदी उदरात असल्यापासून शिवरायांमध्ये स्वराज्याची संकल्पना ज्यांनी जागवली, त्या माँसाहेब जिजाऊंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
|
राजमाता जिजाऊ जयंती फोटो |
राजमाता जिजाऊ यांची माहिती | जिजाऊ माता माहिती मराठी
12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड मध्ये लखोजी जाधवांच्या घरी एका सुंदर कन्येचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं जिजाबाई. लखोजी जाधव हे निजामशाहीत मोठे सरदार होते वं सिंदखेडची देशमुखी त्यांच्याजवळ होती. परकीय लोकांची चाकरी आपण का करावी असा प्रश्न नेहमी जिजाऊंना पडायचा. स्वतःबरोबरच दुसऱ्यांचे देखील रक्षण करता यावं यासाठी जिजाऊंनी जवळपास सातशे मुलींना एकत्र घेऊन स्वतःची सेना देखील बनवली होती. त्या उत्तम तलवारबाजी, घोडेस्वारी जाणत होत्या. कित्येक भाषांचे ज्ञान त्यांना होतं. अशातच वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी डिसेंबर 1605 साली त्यांचा विवाह शहाजीराजांसोबत करण्यात आला . rajmata jijau speech in marathi
जिजाऊंचा थोरला पुत्र संभाजी राजे नेहमी शहाजीराजांसोबत असायचे तर शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी ही जिजाऊंवर सोपवण्यात आली होती. शहाजीराजे सततच्या लढायांमुळे नेहमी दौऱ्यावर असायचे. पण तरीसुद्धा जिजाऊंनी वडिलांची कसर कधीही भासू दिली नाही. जिजाऊंच्या छत्रछायेत शिवाजी राजे हे शिक्षण घेऊ लागले. अगदी कोवळ्या वयापासून स्वराज्य काय असतं, स्वातंत्र्याची चव किती गोड आहे, रामायण, महाभारताच्या कथा इत्यादी त्यांनी शिवरायांना सांगितल्या. शस्त्राबरोबरच शास्त्राचे ज्ञान त्यांनी शिवरायांना यथार्थ दिलं.
जिजाऊ माता माहिती मराठी
पुण्याची जहागिरी
वयाच्या चौदाव्या वर्षी शहाजीराजांनी पुण्याची जहागिरी शिवरायांवर सोपवली. त्यावेळी सततच्या आक्रमणांमुळे पुण्याची अवस्था अगदी भीषण झाली होती. शिवरायांच्या हातांनी सोन्याचा नांगर फिरवून, रयतेच्या मनामध्ये त्यांनी आशेचा किरण जागवला.
हिंदू राज्यांमध्येच आपापसात वाद होते, आणि यामुळेच मराठी जनतेमध्ये एकी नव्हती. जातीय, धर्मीय, द्वेष सर्वत्र पसरला होता. आणि हेच शिवरायांच्या हातून घडू नये, म्हणून जिजाऊंनी प्रत्येक वेळेस त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले. लोकांना समान न्याय देणे, स्त्रियांना सन्मान देणे, त्याचबरोबर राजकारण देखील त्यांनी शिवरायांना शिकवलं. यानंतर स्वराज्याची जी प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांमध्ये निर्माण केली होती तीच प्रेरणा शिवरायांनी बारा मावळ प्रांतातील लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जागवली. मुठभर सैन्य घेऊन मुघलशाही, निजामशाही,आदिलशाहीला, खिंडार पाडण्यासाठी महाराज व त्यांचे मावळे सज्ज झाले.
जिजाऊ माता माहिती मराठी
स्वराज्य प्रेरणा
|
Establishment-of Swarajya-स्वराज्याची-स्थापना |
Motivation/Inspiration Behind Establishing Swarajya
वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधलं, यानंतर शिवरायांनी कधीही मागे वळून बघितलं नाही वेळोवेळी जिजाऊंचा त्यांना सल्ला मिळत गेला. यानंतर एक-एक किल्ले शिवराय जिंकत गेले. आपल्या मगरमिठीत शिवरायांना चिरडून टाकण्यासाठी अफजलखान महाराष्ट्रावर जेव्हा चालून आला, त्यावेळेस आलेल्या संकटाला घाबरून न जाता शिवरायांमध्ये आत्मविश्वास त्यांनी जागवला, भ्याडपणे पळून न जाता या अफजलखानाशी दोन हात केलेच पाहिजेत अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी महाराज यांना कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजलखानाने छळ-कपट करून मारले होते आणि तीच सल जिजाऊंना खुपत होती. आता अफजलखानाला सोडायचं नाही हा निर्धार पक्का झाला होता. अत्यंत चाणाक्ष पद्धतीने शिवराय अफजलखानाला सामोरे गेले. शिवरायांपेक्षा तीन पट बलाढ्य असणाऱ्या अफजलखानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढला. अफजलखान मारला गेला. स्वराज्यावरील आणखी एक मोठं संकट टळलं होतं.
राजकारणातील डावपेच त्यांनी उत्तम आत्मसात केले आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवरायांनी आग्र्याहून केलेली स्वतःची सुटका. पुढे शाहिस्तेखानाला लाल महालात घुसून वार करून पळवून लावण्यामध्ये महाराज यशस्वी ठरले. या सर्व घटनेमुळे महाराजांचा दरारा संपूर्ण हिंदुस्थानात वाढला होता.
जिजाऊ माता माहिती मराठी
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म
|
jijamata-aani-sambhaji-maharaj |
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांत त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झालं पण दुसरा शिवाजी घडवण्याची ताकद अजूनही जिजाऊंमध्ये होती. आणि जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी महाराज घडू लागले.
स्वराज्याच्या युद्धामध्ये कामी आलेल्या मावळ्यांच्या कुटुंबीयांची अगदी मायेनं जिजाऊ काळजी घेत असत, त्यांची विचारपूस करीत असत. स्वतः राजे जेव्हा दौऱ्यावर असायचे तेव्हा स्वराज्याच्या कारभारावर जिजाऊ बारीक लक्ष ठेवून असायच्या. शिवाजी राजांप्रमाणेच इतर मावळ्यांना व सरदारांना त्या आपल्या मुलासारखे वागवत. यामुळेच त्या स्वराज्याच्या जननी माँ जिजाऊ झाल्या. त्यांनी पाहिलेलं स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी सत्यामध्ये उतरवलं.
जिजाऊ माता माहिती मराठी
शिवराज्याभिषेक
6 जून 1674 साली रयतेचे राजे शिवाजी हे छत्रपती झाले. तब्बल 50 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शिवरायांची किर्ती सर्वत्र दुमदुमत होती आणि हे पाहून माँ जिजाऊंचे डोळे आनंदाश्रूंनी नेहमी भरून यायचे. सततच्या दगदगीमुळे त्यांचे शरीर थकले होते. शिवरायांच्या राज्याभिषेका नंतर अवघ्या अकरा दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचं निधन झालं.
शिवरायांबरोबर अवघा महाराष्ट्र पोरका झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं, पण इथे शिवरायांमागे त्यांच्या माऊलीचा म्हणजेच माँ जिजाऊंचा वरदहस्त कायम होता, आणि म्हणूनच आभाळाएवढं कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले.
स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांना त्रिवार अभिवादन!
जय जिजाऊ, जय शिवराय !!.
हा माहितीपूर्ण लेख तुम्हाला कसा वाटला? ह्याची नोंद कृपया करावी!!
धन्यवाद 'राजमाता जिजाऊ जयंती विशेष | Rajmata Jijau Jayanti - 12 January 2024 | जिजाऊ माता माहिती मराठी' वाचल्याबद्दल!!