संत ज्ञानेश्वर यांची माहिती | Sant Dnyaneshwar Information in Marathi
नमस्कार मित्रांनो,
या भारतभूमीला हजारो वर्षांची संत परंपरा लाभलेली आहे. गेल्या शेकडो वर्षात अनेक संत, महात्मे या भूमीमध्ये होऊन गेले, त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, ज्यांनी समाजाला भक्तिमार्गावर आणण्याचे पवित्र काम केलं. आपल्या अभंगांमधून, ग्रंथांमधून, सुख, समाधान, शांती, करुणा, भक्ती, अशा अनेक गोष्टींवर या संतांनी प्रकाश टाकला. आजही इतक्या वर्षानंतर आपल्या संतांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरते.
संत ज्ञानेश्वर यांचे कार्य | संत ज्ञानेश्वर यांची माहिती व कार्य | ज्ञानेश्वर माऊली | dnyaneshwar mauli
तर आज आपण एका अशाच महान संताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा जन्म 13 व्या शतकात महाराष्ट्रामध्ये झाला. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत, वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिणारे, अलौकिक प्रतिभा असणारे मराठी संत, संत ज्ञानेश्वर यांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
-- संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके ११९७ (इसवी सन 1275) रोजी वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणीबाई यांच्या घरी झाला. संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ, तर सोपान देव आणि मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती. “आपेगाव " हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं निसर्गरम्य गाव आहे.
संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत हे संन्यासी होते, विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला निघून गेले पण त्यांच्या गुरूंनी ते विवाहित असल्याचे समजल्यावर त्यांना परत पाठवले आणि यानंतर त्यांना चार अपत्ये झाली, ज्यांची नावे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी होती.
अधिक वाचा : संत एकनाथ महाराजांची माहिती | Sant Eknath Information in Marathi
संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांना भक्ती मार्गाची खूप ओढ होती, विठ्ठलावर त्यांची अपार श्रद्धा होती. तीर्थक्षेत्र करत करत विठ्ठल पंत व त्यांचे कुटुंब आळंदी येथे स्थायिक झाले. विरक्त संन्यासाची मुलं म्हणून समाजाने यांना वाळीत टाकलं होतं. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदी येथील ब्राह्मणांनी नाकारले. यावर उपाय काय असे विठ्ठलपंतांनी धर्मशास्त्रींना विचारल्यावर केवळ देह दंडाची शिक्षा हाच एक उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलांना पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, समाजाने त्यांना प्रेमाने व न्यायाने वागवावं यासाठी विठ्ठल पंत व रुक्मिणी बाई यांनी स्वतः आत्महत्या करून देहाचं प्रायचित्त घेतलं.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर देखील समाजाने यांना हवं तेवढं आपलंसं केलं नाही. अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींपासून देखील त्यांना वंचित ठेवण्यात आलं. पुढे या भावंडांनी आळंदी सोडून पैठणला जाण्याचा निर्णय घेतला, पैठणला गेल्यावर या भावंडांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. भिक्षा मागून ही भावंड पोट भरायची. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत अभंग रचले. अगदी बाल वयात त्यांची कुशाग्रबुद्धी व मराठी भाषेवरील त्यांचा हातखंडा पाहून तेथील ब्राह्मण आश्चर्यचकित झाले, आई-वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलांना देणं हे चुकीचं आहे, असे मानून 1288 मध्ये पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भावंडांना शुद्ध करून पुन्हा एकदा समाजात आणले.
अधिक वाचा : संत तुकाराम माहिती मराठी - Sant Tukaram Information in Marathi
संत ज्ञानेश्वर व त्यांच्या इतर भावंडांचा मराठी भाषेवर जबरदस्त पगडा होता. संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वर हे म्हणजे ज्ञान आणि शास्त्राचे मूर्तिमंत प्रतिक होते. ते सतत विठ्ठल भक्ती मध्ये लीन असायचे. लोकांनी त्यांची खूप निंदा केली परंतु त्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष करून अध्यात्माचं काम निरंतर सुरू ठेवलं. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीतील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा “ ज्ञानेश्वरी " हा ग्रंथ त्यांनी रचला. तब्बल 9000 ओव्यांनी सजलेला हा ग्रंथ समाजातील सर्व स्तरावरील लोकांना आजही भुरळ घालतो. संस्कृत भाषेमध्ये असणार ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत म्हणजेच मायबोली मराठीमध्ये आणलं.
यानंतर ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा 800 ओव्यांचा स्वरचित ग्रंथ लिहिला. या ओव्या ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेची खोली स्पष्ट करतात.
चांगदेव नावाचे एक महान योगी तापी नदीच्या किनारी रहात असत, चौदाशे वर्ष तप करून त्यांनी सिद्धता प्राप्त केली होती, असे असले तरी ते अहंकारी होते. आळंदी मधील संत ज्ञानेश्वरांच्या अलौकिकाची ख्याती सर्वदूर पसरली होती. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले, हा प्रसंग अनेकांनी याची देही याची डोळा पाहिला होता. चांगदेवांना या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले व खरे जाणून घेण्यासाठी, त्यांनी ज्ञानेश्वरांना एक कोरे पत्र पाठवले, चांगदेवांचा शिष्य ज्ञानेश्वरांजवळ पोहोचताच ज्ञानेश्वरांनी काय रे कोरेच पत्र आणलेस? असे उद्गार काढले. हे ऐकून चांगदेवांचा शिष्य आश्चर्यचकित झाला. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून संत ज्ञानेश्वरांनी 65 ओव्यांचे पत्र चांगदेव यांना लिहिले आणि म्हणूनच याला “ चांगदेव पासष्टी " असे म्हटले जाते. हे पत्र चांगदेवांनी वाचले पण त्यांना त्या शब्दांचा अर्थ उमगला नाही, अखेर अहंकारी चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांची भेट घ्यायचं ठरवलं आणि मोठा लवाजमा घेऊन ते ज्ञानेश्वरांच्या भेटीला निघाले. चांगदेव आळंदी जवळ पोहोचताचं काही शिष्य ज्ञानोबा यांच्याकडे आले आणि त्यांना याबद्दल माहिती दिली. यावेळेस घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर व त्यांची भावंड बसली होती. मोठे तपस्वी योगी चांगदेव आपल्या भेटीसाठी येत आहेत हे पाहून निवृत्तीनाथांनी आपण देखील उतरून त्यांना थोडं सामोरे जावं असं ज्ञानोबांना सुचवलं, यावर ज्ञानोबा म्हणाले आपण नाही ही भिंतच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाईल आणि असे म्हणतात की भिंत चालू लागली. ( संत ज्ञानेश्वर चमत्कार )
वाघ, सर्प, अशा सजीव प्राण्यांवर योगी चांगदेवांची हुकूमत होती, पण दगड मातीच्या निर्जीव भिंतीवर ज्ञानेश्वरांची हुकूमत बघितल्यावर त्यांचे गर्वहरण झाले व त्यांनी ज्ञानेश्वरांना दंडवत घातले.
संत ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायातील वैष्णव पंथातील होते. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग, भक्ती-कविता अशा महान साहित्याची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. या साहित्यातून त्यांनी समाजागृती केली.
ज्ञानेश्वर महाराज समाधी कधी घेतली?
“ ज्ञानेश्वरीच्या" शेवटच्या अध्यायात पसायदान लिहून ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. थोर योगी, तत्त्वज्ञानी, संत, कवी असलेले संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संत होते. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इंद्रायणी नदीच्या काठी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. यानंतर झालेल्या अनेक संतांनी संत ज्ञानेश्वर यांचा वारसा अखंडपणे अविरत चालू ठेवला.
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी !!
"संत ज्ञानेश्वर यांची माहिती | Sant Dnyaneshwar Information in Marathi" वाचल्याबद्दल धन्यवाद!!