Makar-Sankranti-2022 |
मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti information in marathi भारत वैविध्यपूर्ण संस्कृतीने, विविध धर्माच्या लोकांनी सामावलेला देश आहे. अनेक धर्म, जाती, भाषा व त्यांचे धार्मिक सण साजरी केले जातात. प्रत्येक सणाला शास्त्रीय तसेच वैज्ञानिक कारण आहेच. अशा विविध सणांपैकी एक म्हणजे मकर संक्रांती. जानेवारी महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच हा सण येतो. Makar Sankranti 2022
पंजाब, हरियाणा या प्रदेशांत लोहरी म्हणून हा सण 13 जानेवारीला साजरा केला जातो. आसाममध्ये बिहू या नावाने ओळखला जातो. गुजरात मध्ये उत्तरायण, तामिळनाडू मध्ये पोंगल, कर्नाटक आणि तेलगू राज्यांमध्ये संक्रांत अश्या विविध नावांनी या सणाला ओळखले जाते. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही हा सण खूप थाटामाटात साजरा केला जातो. नेपाळमध्ये माघी, थायलंडमध्ये सोङ्क्रान तर लाओस मध्ये पिमालासो आणि म्यानमारमध्ये थिंगयान अशा नावाने साजरा केला जातो.
मकर संक्रांत माहिती
हा सण हिवाळ्यातील पौष महिन्यात येतो आणि ह्याचं वेळी उष्णतेची उबेची गरज भासते. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ वाटले आणि खाल्ले जाते. तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत. तसेच तीळ टाकून ज्वारी व बाजरीच्या भाकरी केल्या जातात. आणि ग्रामीण भागात बारा प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण असलेली भाजी केली जाते. या दिवशी तिळगुळ वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे वर्षभरात झालेल्या चुका, गैरसमज, राग, अपमान विसरून तोंड गोड करणे.
संक्रांत म्हणजे सूर्य वर्षाच्या सुरुवातीला मकर राशीमध्ये संक्रमण करतो याचं प्रक्रियेला मकर संक्रांत म्हणतात. या सणाच्या आधी रात्र मोठी असते तर दिवस लहान व सणानंतर दिवस मोठा व रात्र लहान होते. व हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते.
मकर संक्रांत भोगी ह्या सणापासून सुरू होते. संक्रांतीच्या आधीच्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागात, सुगडांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. सुगडं म्हणजे एक लहान मडकं असतं, त्यात ऊस, गहू, हळकुंड, बोर, तांदूळ, हळदीकुंकू, घेवडा यांसारख्या इत्यादी गोष्टींनी मडकं भरून सुवासिनी सुगड पूजतात.
किंक्रांत माहिती
मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. या सणाला स्त्रिया एकमेकींना धान्याचं वाण देतात. आहाराच्या दृष्टीने हा सण अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. तिळगुळ देऊन नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे तसे बाराही महिन्यात सण आहेत. पण इंग्रजी दिनदर्शिकेमधला, मराठी पहिला महत्वाचा सण हा मकर संक्रांत ओळखला जातो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा |
मकर संक्रांत का साजरी करतात?
धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेवाची भेट घेतात आणि शुक्राचाही उदय होतो. या वर्षी मकर संक्रांती १४ जानेवारी २०२२ ला म्हणजे आज शुक्रवारी साजरी केली जात आहे.
मकर संक्रांतीला उत्तरायण असेही म्हणतात, याने ऋतू परिवर्तन होते. शरद ऋतू क्षीण होतो व वसंत ऋतूचे आगमन होते.
भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की उत्तरायणाच्या सहा महिन्याच्या शुभ काळात पृथ्वी प्रकाशमय होते. ह्या प्रकारात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो. महाभारतामध्ये भीष्म पितामह ज्यांना इच्छा मृत्यु वरदान मिळालेलं होते त्यांनी उत्तरायणाच्या दिवशी शरीर त्याग केला.
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश इथे संक्रांतीला मेळाव्यांचे आयोजन केले जाते. यावेळी लाखो श्रद्धाळू गंगेच्या तीरावर स्नान आणि दानधर्म करतात. मकरसंक्रांतीला तिळगुळ प्रमाणे पतंग उडवण्याची परंपरा आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये ३-४ दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवले जातात. व रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात. सणाच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य देखील दाखवला जातो.
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!” तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! तिळगुळ घ्या गोड गोड बोला !!
धन्यवाद 'मकर संक्रांत माहिती मराठी – Makar sankranti information in marathi' वाचल्याबद्दल !!
लेख -: आश्विनी गिते