नर्मदा परिक्रमा - एक अविस्मरणीय सत्य अनुभुती | Narmada Parikrama
(प्रवास वर्णन)
नर्मदा परिक्रमा - एक अविस्मरणीय सत्य अनुभुती | Narmada Parikrama :
"त्वदीय पादपंकजंम् नमामी देवी नर्मदे"
गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु।।
Narmada Nadi /River -: सर्वात पवित्र नद्या सात त्यातीलच एक नर्मदा मैया होय.
नर्मदा परिक्रमाबाबत माझ्या आयुष्यातला सत्य अनुभव आपल्याला सांगत आहे. मीे ४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१६ या दरम्यान नर्मदा परिक्रमा केली. खुप छान व सुंदर अनुभव होता. आम्ही १० लोक होतो. पहिल्या दिवसापासुनच आमचा छान ग्रुप जमला. नोटबंदी झालेली असल्याने फारसे प्रवासी नव्हतेचं!
आता तुम्ही म्हणाल परिक्रमा नर्मदेचीच का??? इतर नद्यांची का नाही. इतर नद्यांच्याही परिक्रमा केल्या जातात. मात्र,शास्त्राने सांगितलेली व जगभर मान्य असलेली एकमेव परिक्रमा म्हणजे नर्मदा परिक्रमा होय.
Narmada River |
नर्मदा नदीचे विविध नावे:
ह्या नर्मदेला रेवा, नर्मदा, चित्रोत्पला, रंजना, विपाशा, विदशा अशी अनेक नावं आहे. सरळ रेषेत वाहते म्हणुन विदशा, माया/मोह यांचे पाश मोकळे करणारी म्हणुन विपाशा.
काही भाविक जलहरी परिक्रमा करतात. अमरकंटक ते कठपोर समुद्र न ओलांडता पुन्हा कठपोर ते अमरकंटक आणि उत्तर तटावर अमरकंटक ते मिठीतलई पुन्हा अमरकंटक अशी समुद्र न ओलांडता दोनदा होणारी परिक्रमा जलहरी परिक्रमा म्हणुन ओळखली जाते.
सोमसुत्री, जलहारी, रुद्रपरिक्रमा, हनुमान परिक्रमा असे परिक्रमेचे चार प्रकार सर्वश्रृत आहेत.
ही परिक्रमा आपल्याला गरजा कमी करणे, सहनशिलता, स्वतःच्या स्वभावाला मुरड घालणे, निर्भय, निर्भर होणे, मौन, चिंतन, जप, प्रगतीकडे वाटचाल असं सार काही शिकवते.
ओंकारेश्वरपासुन आम्ही सुरुवात केली होती. व समाप्तीसुद्धा ओंकारेश्वरलाच केली. परिक्रमा जिथुन सुरु करतात तिथेच पुर्ण केली जाते. तथापि, सोबतच्या जलाचा जलाभिषेक जेव्हा ओंकारेश्वराला केला जातो, तेव्हाच परिक्रमेची सांगता होते. वाहनाने परिक्रमा करतांना साधारणपणे ३५०० ते ४००० किमी प्रवास करावा लागतो. मीही परिक्रमा वाहनानेच केली आहे.
Narmada Parikrama Route | नर्मदा परिक्रमा मार्ग
नर्मदा परिक्रमा कधी केली जाते?
रेवासागर | रत्नसागर !!
असं म्हणतात की अश्वत्थामा व नर्मदा देवी कुठल्या तरी रुपात येऊन तुम्हांला दर्शन देतात. असं मी अनेकांच्या अनुभवांतुन ऐकलं,वाचलं होतं. आम्ही कटपोर ते मिठीतलई हा साडेचार तासांचा समुद्र प्रवास करत होतो. ह्या ठिकाणी नर्मदा नदी समुद्राला मिळते. नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी असुन अरबी समुद्राला मिळते, त्याला रेवासागर किंवा रत्नसागर म्हणतात.
दक्षिण तटावरुन उत्तर तटावर होडीतुन जाताना हा सागर पार करावा लागतो. २७ किलोमीटर रेवासागर पार करण्यास कमीत कमी चार तास लागतात. जिथे नर्मदा मैया समुद्राला मिळते तिथे सगळे यात्री पुजा करतात. नर्मदेची ओटी भरतात, तर असंच मीही पुजा सामग्री काढली, पुजा करु लागलो. व ती ओटी समुद्राला/नर्मदेला अर्पण करायला पाण्यात सोडणार इतक्यात एक मध्यम वयस्क, कपाळी मोठा टिळा असलेली, पांढरी साडी परिधान केलेली स्त्री मला म्हणाली,
"बेटा पाणी में क्यु बहा रहे हो,मुझे दे दो."
मला क्षणभर वाटलं आमच्याच नावेतल्या प्रवासी असतील. गरीब असतील म्हणुन मागत आहे. मी विचार केला पाण्यात समर्पण करुन तरी काय होणार? ह्या वापरतील तरी. म्हणुन त्या वस्तु म्हणजे ओटी, साडी, प्रसाद त्यांच्या हातात देवुन नमस्कार केला. व मी माझी बॅग आवरायला लागलो. अजुन दोन अडीच तासाचा प्रवास राहिला होता. थोडा वेळाने सहज लक्ष गेलं तर ती स्त्री कुठेच दिसेना. मी चौफेर पाहिलं कुठेच नाही.
म्हटलं जाणार कुठे? असं अचानक समुद्र प्रवासातुन जाणं शक्यच नाही. सर्वत्र अथांग पसरलेला समुद्र व प्रवास तर सुरच आहे. मन विचारमग्न झालं. नावाड्याला विचारलं तर तो म्हणाला..
"अरे, भाई नाव में ऐसी कोई सवारी थीं ही नहीं, तुमने किसी ओर को देखा होगा."
मी त्याला सगळा वृत्तांत सांगितला की मी स्वतः त्यांच्या हातात वस्तु दिल्या मला पुर्णपणे आठवतयं. आणि त्याला विचारलंही इतक्या प्रवाश्यांमध्ये तुला कसं माहित अशी स्त्री तुझ्या होडीत नाही. तु इतक्या ठामपणे कसं सांगु शकतो.
रोज भेटणारी लोकं आपण विसरतो, ही तर एक प्रवासी व्यक्ती..... त्यावर तो म्हणाला "भैया मेरा दिमाग कंम्प्युटर जैसा है, एक बार जिसे देखा, भुलता नहीं. तुरंत पहचानता हु. नाव में सबको बिठाने से पहले ही मैं हर एक को देख लेता हु. गिनकर सबको बिठाता हु. आखिर आप सब मेरी जिम्मेदारी हो."
मी वारंवार विचार केला असं कसं होईल? त्यावर तोच हसुन म्हणाला
"अरे, भैया नर्मदा मैया खुद आकर आपसें अपनीं पुजा-पत्री ले गई. बहुत नसिबवाले हो आप".
त्याच्या त्या वाक्याने मी क्षणात भानावर आलो. अंग रोमांचित झालं. आनंदाश्रु ओघळु लागले. त्याच वेळी खिन्नही झालो की मी कसं ओळखु शकलो नाही? त्याचवेळी मैयाला त्रिवार नमन केलं.
तितक्यात मिठीतलई किनारा आला. नावाडी एक-एक करत सगळ्यांना उतरवु लागला. सरते शेवटी मी उतरलो. त्याने मला आलिंगन दिलं व म्हणाला, "भैया बुरा ना मानो तो एक बात माँगु आपसे?????
मी हो बोललो,
त्यावर तो म्हणाला, " थोडी दक्षिणा दे दो, घरपर खाने के लिए तेल लेके जाना है. सवारी का सारा पैसा तो मालिक ले लेगा."
मी जवळ होते त्यापैकी त्याला काही पैसे देवुन पुढे गेलो.
संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी अचानकच, खुप वेळानंतर आठवलं.... त्या नावाड्याने डोक्याला पंचा(ऊपरणं) बांधलं होतं. व तो तेलासाठी पैसे घेवुन गेला. इतरही कारण सांगु शकला असता??? तेलच न्यायचं असं का म्हणाला??? कोण होता तो???
म्हणजे अश्वत्थामाच होता की काय???
पुन:श्च एकदा माझे अश्रु ओघळु लागले. हात जोडुन मनातुन 'नर्मदे हर' म्हणालो. इतक्यात माझ्या सोबतच्या प्रवाश्यांनी जेवणासाठी आवाज दिला. माझी नर्मदा परिक्रमा खर्या अर्थाने त्याच वेळी पुर्ण झाली. अगदी कृतकृत्य झालो. हा माझ्या आयुष्यात घडलेला खरा साक्षात्कार आहे.
धन्यवाद 'नर्मदा परिक्रमा - एक अविस्मरणीय सत्य अनुभुती | Narmada Parikrama' वाचल्याबद्दल!!