दत्तजयंती विशेष : श्री कर्दळीवन पंच परिक्रमा (प्रवास वर्णन) | Datta Jayanti 2023
 |
Datta-Jayanti-Vishesh-2021 |
'दत्तजयंती विशेष : श्री कर्दळीवन पंच परिक्रमा (प्रवास वर्णन) | Datta Jayanti 2023' भारत हा पवित्र तिर्थस्थळांची तपोभुमी, मांदियाळी असलेला देश आहे. अनेक अशक्य, गुढ, अवघड तिर्थक्षेत्र आपल्या भारत भुमींत आहेत. अश्या अनेक अशक्यप्राय स्थळांना जाण्याचं भाग्य मला अगदी कमी वयामध्ये लाभलं आहे. तिर्थराजांच्या प्रणालीतील असंच एक ठिकाण म्हणजेचं
श्री क्षेत्र कर्दळीवन (श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान)!
"गुर्रुब्रम्हा, गुर्रुविष्णु,
गुर्रुदेवो महेश्वरा।।
गुरु साक्षातः परब्रम्ह।
तस्मै श्री गुरवे नमः।।"
दरवर्षी वर्षभरांत किमान एकदा तरी दैनंदिन जीवनांतुन वेळ काढुन प्रवास नियोजन करुन आजपर्यंत चार धाम, सप्त मोक्षपुरी, बारा ज्योर्तिलिंग, नर्मदा परिक्रमा, आळंदी ते पंढरपुर आषाढीची पायी वारी असे एक ना अनेक स्थळं एकदा नव्हे तर अनेकदा मी बघितली आहेत.
त्यातच २०१७ ह्या वर्षी कर्दळीवनांत जाण्याचा योग आला.
दरवेळी प्रमाणे ह्याही प्रवासाला मी एकटाच निघालो होतो. पण, तेही अगदी सहज शक्य नव्हतंच. कारण, त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यांत मला डेंग्यु झाला होता व नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी प्रवासाचं नियोजन होतं. नुकतचं आजारपणातुन बरा झाल्यामुळे खुप अशक्तपणा होता. त्यामुळे, घरातील सगळेच ह्या प्रवासासाठी विरोध करत होते. त्यातच, अगदी प्रवासाला निघण्यापुर्वी दोन दिवस अगोदर आईला बरं नसल्याने दवाखान्यांत अॅडमीट केलं होतं.
माझ्यापुढे द्वंद होतं काय करावं?????
स्वामी महाराज खुपच परिक्षा बघत होते असं म्हणायला हरकत नाही.
आई म्हणजे माझं सर्वस्व. मी तिला असं आजारपणात सोडुन कसं जाणार म्हणुन मी प्रवास रद्द करण्याबाबत आयोजकांकडे गेलो. तेही ऐनवेळी प्रवास रद्द करतो असं ऐकुन खिन्न झाले. कारण, प्रवास नियोजनाबाबत अनेकदा भेट झाल्यामुळे आमच्यांत खुप छान ट्युनिंग जमलं होतं. ते तिकिट रद्द करतो असं म्हणाले. मी पुन्हा दवाखान्यांत आईजवळ आलो. आईला माझी परिस्थिती पुर्णपणे समजत होती. प्रवास म्हटला कि मी किती अगतिक, उत्सुक, आनंदी असतो हे तिला माहित आहे.
"तु जा,मी घेईन माझी काळजी" असं म्हणुन आई मला समजावत होती. पण, माझ्यासाठी ते अशक्य होतं. प्रवास काय कधीही करता येईल. आईची तब्ब्येत महत्त्वाची होती. परंतु, दत्त जयंतीलाच (shri datta jayanti ) आम्ही कर्दळीवनांत असणार होतो. त्यामुळे, ती ओढही मला शांत बसु देत नव्हती. कर्दळीवनांत जायचं म्हणुन दरवर्षीचं श्री गुरुचरित्र पारायण ही मी एक आठवडा अगोदरच सुरु केलं होतं. पारायण पुर्ण करुन मी दत्त महाराजांना विनवणी केली. प्रार्थना करुन रात्री पुन्हा दवाखान्यांत गेलो. तर डाॅक्टर म्हणाले कि आईची प्रकृती एकदम ठिक असल्याने तिला उद्या घरी सोडु.
मी आश्चर्यचकितच झालो. कधी-कधी काही गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात हेच खरं आहे.
मला प्रचंड आनंद झाला, परंतु एव्हाना आमच्या यात्रा आयोजकांनी माझं तिकिट रद्द केलं असावं म्हणुन मी शांत, थोडासा उदास झालो. रात्रभर झोप येईना. कारण, स्वामींच्या तिर्थ स्थळाला जाण्याचा मला ध्यास लागला होता. अगदी प्रवासाला निघण्याचा दिवस उजाडला. आईला दवाखान्यांतुन घरी नेण्यापुर्वी डिस्चार्ज प्रोसेस पुर्ण करत असतांनाच मला रमेश ह्या आमच्या प्रवास आयोजकांचा आईच्या तब्येतीची विचारपुस करायला फोन आला.
तेव्हा मी म्हणालो, "आई ठिक आहे, आज सोडतील आईला घरी."
तेव्हा ते म्हणाले "मग संध्याकाळी आम्ही मनमाडला तुझी वाट बघतोय,लवकर तयारी करुन ये." त्यांनी माझं तिकिट रद्द केलंच नव्हतं. माझ्यासाठी हा दुसरा आश्चर्याचा धक्का होता. क्षणभर मला विश्वासच बसेना. माझ्या अंगात, रोमरोमांत जणु नवा उत्साह संचारला. घरी येऊन लगेच प्रवासाची तयारी करुन मी संध्याकाळी मनमाड स्टेशनला पोहचलो. संध्याकाळी ७ वाजेच्या काकीनाडा एक्सप्रेसने आमचा प्रवास सुरु झाला. रात्रभर व दुसर्या दिवशी पुर्ण प्रवास करुन आम्ही पिठापुरला पोहचलो. आईलाही दवाखान्यांतुन घरी सोडल्यामुळे मी निर्धास्त झालो होतो.
dattatreya jayanti | datta jayanti marathi
सुरुवातीचे ३ दिवस आम्ही पिठापुरलाच होतो. पहाटेच उठुन नित्यकर्म आटोपुन आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरांत जाऊन पुजा करुन भजन म्हणायचो. माझ्यासोबतच ह्या प्रवासाला एकुण २५० च्या जवळपास प्रवासी होते. कुणी एका भक्ताने श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरांत मुर्तीला सोन्याचं सिंहासन अर्पण केल्याचे फोटो मला Whats app वर त्या दिवशी येत होते. मात्र,तो अनुपम्य सोहळा त्या वेळी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहुन मी ''याचि देही,याचि डोळा'' प्रत्यक्ष अनुभवत होतो. पिठापुर अगदी छोटसं मात्र तितकचं मनोवेधक गाव आहे. दक्षिण भारतातील अनोख्या बांधकाम शैलीचा नजराणा आपल्याला प्रत्येक घराच्या वास्तुरचनेत बघायला मिळतो.
गावातील माणसं तर अगदी साधी-भोळी आहेत. पुजा, अभिषेक अशी नित्यकर्म आटोपुन आम्ही जवळच्याच काही स्थळांनाही जाऊन यायचो. अण्णावरम् येथील सुप्रसिद्ध सत्यनारायण मंदिरांत जाण्याचाही ह्या प्रवासामुळे दुसर्यांदा योग आला. दरम्यान डेंग्युमुळे अंगांत अशक्तपणा होताच. त्यामुळे, एक दिवस रात्री मला खुप ताप भरला, रात्रभर उलट्या झाल्या. मी हा पुढचा प्रवास करु शकेल कि नाही??? असं मनात यायला लागलं. तेव्हा मी समर्थांवर रागावलोच, त्यांना म्हटलं प्रवासाच्या सुरुवातीपासुनच तुम्ही माझी खुप परिक्षा घेत आहात. अगोदर घरच्यांचा विरोध, मग आईचं आजारपण अन् आता हा त्रास. समर्थांना एकच मनोमन सांगितलं,इतक्या जवळ आल्यानंतर मी तुमचं दर्शन घेतल्याशिवाय अजिबात परत जाणार नाही. काय व्हायचं ते होऊ द्या.
पण, कदाचित स्वामी मला सांगत होते. "निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना" स्वामींचा हा तारकमंत्रच मी मनात जपत राहिलो.
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असचं स्वामी मला सांगत होते. माझ्या सर्व सह प्रवाश्यांनी तेव्हा माझी खुप काळजी घेतली. अखेर, शेवटच्या दिवशी पालखी सोहळा झाल्यानंतर आम्ही पिठापुरहुन रात्रीच्या प्रवासाने श्रीशैल्यम्ला निघालो. रात्रभर गाडीत छान झोप झाल्यामुळे सकाळी मला अशक्तपणा जाऊन जरा प्रसन्न वाटलं.
श्रीशैल्यम हे बारा ज्योर्तिंलिंगापैकी एक ठिकाण आहे. हैद्राबादपासुन सुमारे २२५ किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. ह्या ठिकाणी येण्याचाही हा दुसर्यांदा योग होता. श्री शैल्यमला येताच श्री साक्षी गणपती येणार्या सर्व भक्तांची साक्ष ठेवतात. ह्याच ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे ही मंदीर आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फुर्ती केंद्र म्हणुन हे मंदिर प्रसिद्घ आहे. भ्रमरांबा हे १८ शक्ती पिठांतील मंदीरही श्री शैल्यमला आहे. ह्या सगळ्या स्थळांना भेटी देऊन व श्री शैल्यमचे दर्शन घेऊन आम्ही दुसर्या दिवशी अगदी मोजकचं साहित्य सोबत घेऊन पाताळ गंगेद्वारे मोटार बोटीतुन कर्दळीवन प्रवासाला सुरुवात केली.
गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज कि जय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत सुमारे एक सव्वा तास प्रवास करुन आम्ही व्यंकटेश किनार्याला पोहचलो. कृष्णा नदीचं ३००० फुट खोल विस्तीर्ण पात्र, नल्लामलई पर्वतरांगामधील निसर्ग सौंदर्य न्याहाळत २२किमी प्रवास करुन आम्ही किनारा गाठला.
आता आमचा सर्व सोयींयुक्त जीवनशैलीशी संपर्क तुटला होता. मोबाईल, इंटरनेट पुढील ३ दिवस बंद असणार होते. व्यंकटेश किनार्याला आप्पाराव स्वामींचा श्री दत्तात्रय आश्रम आहे. ते त्यांच्या पत्नी समवेत कर्दळीवन यात्रेकरुंची नाश्ता, जेवणाची अविरत सेवा करतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. कर्दळीवन प्रवासासाठी जास्तीत जास्त लोकांचा समुह असावा. कारण, हे खुप निबीड, र्निमनुष्य अरण्य आहे. प्रवासासाठी आपल्याला तेलंगणा वन विभागाची पुर्व परवानगी घ्यावी लागते, असा नियमच आहे.
अनेक लहान-मोठे असे ६ पर्वत ओलांडुन, पावलागणिक शारिरीक क्षमतेची परिक्षा पुर्ण करत आम्ही ९ किमी चालत आल्यावर अक्क महादेवींच्या गुहेजवळ पोहचलो. स्वामींनीच हि अवघड पाऊलवाट सोपी केली असं वाटलं. आमचा पुढील ३ दिवस मुक्काम ह्यांच गुहेत असणार होता. रत्त्यातच श्री समर्थाचं पहिलं पाऊल ज्याठिकाणी उमटलं त्याठिकाणी आम्ही मनोभावे पुजा केली. अक्क महादेवी ह्या १२ व्या शतकातील एक महान वीर शैव संत होऊन गेल्या. ह्या संपुर्ण नल्लमलई पर्वत रांगेत चेंचु ही आदिवासी जमात बांबुच्या झोपड्यांमध्ये वास्तव्यांस आहे.
अक्क महादेवींच्या गुहेत अक्क महादेवी, मल्लमा देवी, स्वयंभु शिवलिंग व श्रीपाद श्रीवल्लभ यांची मुर्ती आहे. ३ दिवस रहायचं म्हटल्यावर स्वयंपाकही आमचा आम्हांलाच करायचा होता. गुहे जवळच एक बारमाही धबधबा सतत वाहत असतो. आपली पाण्याची सोय तिथुनच होते. आम्ही अगदी आदिवासींप्रमाणे सरपण(सुकी लाकडं) गोळा केली. दगड गोळा करुन त्याची चुल रचली.
काही आदिवासींनी आम्हांला व्यंकटेश किनारा ते ह्या गुहेपर्यंत अन्नधान्य किराणा आणण्यात मदत केली. रोज चुल पेटवुन अगोदर सगळ्यांना चहा, जेवण असं सगळ्यांच्या मदतीने आम्ही कार्य करत होतो. एकच मोठं पातेले व मोजकीच भांडी! त्यामुळे, चहा झाला कि पातेलं, भांडी धुवुन मग पुढचा स्वयंपाक करायचा. आमच्यासाठी ही पर्वणीच काही वेगळी होती.
दुसर्या दिवशी असंख्य दुतर्फा वारुळांतुन सर्प, अजगर न्याहाळत, वन्य प्राण्यांचे आवाज ऐकत, डेरेदार वृक्षवल्लीच्या साक्षीने, पाण्याचा खळखळाट अनुभवत व अनेक खाच-खळगे पार करत आम्ही स्वामींच्या प्रकटस्थानाजवळ पोहचलो. तो दिवस होता ४ डिसेंबर २०१७ श्री दत्त जयंतीचा.
श्री गुरुचरित्राच्या ५१व्या अध्यायांत ४८व्या ओवींत उल्लेख असल्याप्रमाणे,
"आम्हांस आज्ञापिती मुनी।
आम्ही जातो कर्दळीवनी।।"
याप्रमाणे १३८१ मध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनांत आले. त्याठिकाणी सुमारे ३५० वर्ष तप साधना केल्यानंतर एक चेंचु आदिवासी लाकडं तोडायला आला असता त्याच्या कुर्हाडीचा घाव बसल्याने महाराजांची तप साधना भंग पावली. त्यातुन एक तेजस्वी आकृती बाहेर आली तेच श्री स्वामी समर्थ महाराज होय. तिथुनच श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. संपुर्ण भारतात भ्रमण करुन ते शेवटी अक्कलकोटला आले.
आद्य शंकराचार्य, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्रीधर स्वामी, प.पु.श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी, श्री रामदास स्वामी, श्री जमदग्नी ऋषी, श्री मार्कंडेय ऋषी अश्या किती तरी सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभुमींत आज दत्त जयंतीच्या मुहुर्तावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं.
१९९९ साली गाणगापुरहुन व्यंकटेश किनार्याला आलेल्या श्री.दिनानाथ पुजारी, श्री.श्रीकांत पुजारी आणि श्री.अरविंद भट पुजारी यांच्यामुळे हे प्रकट स्थान हळुहळु सगळ्यांना परिचित होत गेलं आहे.
guru dattatreya jayanti vishesh
एका बारमाही शितल धबधब्याच्या जलाने शुर्चिभुत होऊन आम्ही श्री स्वामी समर्थांच्या प्रकटस्थानाचं दर्शन घेतलं. तिथे रुद्राभिषेक केला. श्री गुरुचरित्राच्या ४थ्या अध्यायाचं दत्त जन्माचं वाचन करुन आरती करुन मनोभावे पुजा संपन्न केली. जीवन अगदी कृतार्थ वाटु लागलं. मानवी हस्तक्षेपापासुन अगदी दुर अश्या निबीड अरण्यांत आयुष्याचे अविस्मरणीय, रोमांचकारी असे ३ दिवस पार पडले.
प्रकटस्थानापासुन पश्चिम दिशेला ३ किमी पुढे अश्या बिल्ववनांतही आम्ही जाऊन आलो. हा मार्ग ही तितकाच कठीण आहे. भगवान शंकरांनी श्री मार्कंडेय ऋषींना येथे साक्षात दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. पुन्हा आम्ही अक्क महादेवींच्या गुहेत मुक्कामाला आलो. प्रकटस्थानातुन आणलेली वारुळाची माती मी आजही स्वामींचा आशिर्वाद म्हणुन माझ्याकडे जपुन ठेवली आहे.
पुर्णतः जंगल असल्याने वन्य प्राण्यांची येथे भिती असते. घनदाट झाडी, किर्र आवाज. अंधार ही लवकरच पडतो. संध्याकाळचा स्वयंपाक करुन नैवैद्य आरती नंतर मध्यरात्री पर्यंत आमची भजनांची साद रात्र जागवत होती. शेवटच्या दिवशी आम्ही छान पैकी खिचडी व केशरी(गोड) भात असा नैवैद्य केला. पुणे, मुंबईहुन आलेल्या २२ प्रवाश्यांनी त्यादिवशी गुहेत आमच्या सोबतच मुक्काम केला.
त्यांनी आणलेल्या मेणबत्तीच्या शेकडो पणत्यांची आरास करुन आम्ही गुहेचा अख्या परिसर अजळुन जणु दिपोत्सवच गुहेत साजरा केला. माझ्या डोळ्यांचं पारण फिटलं. मनाच्या पटावर आठवण रुपी लेखणीने हा प्रसंग कायमचा कोरला गेला. तिसर्या दिवशी प्रवास पुर्ण करुन आम्ही परत येतांना अजुन एका गुहेतील स्वयंभु शिवलिंगाचं दर्शन करुन पुन्हा बोटीतुन प्रवास करुन श्री शैल्यमला आलो. दुसर्या दिवशी निघण्यापुर्वी पुनःश्च श्री शैलमचं दर्शन करुन हैद्राबादला आलो.
हैद्राबादला काही खरेदी करुन तिथुनच रेल्वेने प्रवास करुन नाशिकला परत आलो. ह्या प्रवासामुळे मला अनेक नविन सोबती, मित्र मिळाले हे वेगळं सांगायलाच नको.
शारिरीक क्षमतेची खरी कसोटी असणारा असा हा अवर्णणीय, अद्भुत, रमणीय, रोमांचकारी प्रवास नेहमीच माझ्या लक्षात राहिल.
प्रारब्ध, पुर्व संचिताशिवाय हे शक्य नाही.
शेवटी एवढचं म्हणेल
"निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना."
अर्तक्य अवधुत हे स्वर प्रगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।"
पुन्हा भेटुया एका नविन प्रवासवर्णनासोबत.
लोभ असावा आणि वृद्धिंगत व्हावा.
धन्यवाद 'दत्तजयंती विशेष : श्री कर्दळीवन पंच परिक्रमा | Datta Jayanti 2023' वाचल्याबद्दल ! लेखनः- पंकज सविता सुधाकर पाठक.(नाशिक)