गणपती उत्सवातली एक आठवण | गणपती माहिती मराठी | ganesh chaturthi 2023
गणपती उत्सवातली एक आठवण | गणपती माहिती मराठी | ganesh chaturthi 2023 | गणपती बाप्पा मोरया! मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच बालपणीच्या काहीतरी आठवणी असतात. काही भन्नाट, विनोदी, अविस्मरणीय अश्या. खरं तर लहान असतांना आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपण मोठे कधी होणार???कारण मोठे होतांनाची स्वप्नचं प्रत्येकाची वेगळी असतात. त्यात जर आपण घरात भांवडांमध्ये लहान असलो तर ही ओढ अधिकच असते. happy ganesh chaturthi 2023
म्हणतात ना "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये." आपल्याला सगळ्याचं खुप ऐकावं लागतं. पण, आपण तितकेच सगळ्यांचे लाडकेही असतो. तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे मी आमच्या घरात सगळ्यांत लहान, सगळ्यांचा लाडोबा. सगळ्यांचा माझ्यात प्रचंड जीव. माझ्या आजीचा तर खुपच जास्त!
माझ्या आयुष्यातली अशीच एक अविस्मरणीय आठवण म्हणजे गणपती उत्सवातली. ganpati festival
आम्ही एकाच वाड्यात तीन कुटुंबं अगदी अनेक वर्ष गुण्यागोविंदाने रहायचो. दरवर्षी आम्ही तिन्ही कुटुंबीय १५ ते २० जण एकञच गणपती बघायला जायचो. असचं एकदा आम्ही सगळे संध्याकाळी निघालो. गणपती उत्सवाचा आठवा दिवस होता. मी त्यावेळी तिसरीला होतो शाळेत.
गणपती उत्सव म्हंटला की चहुकडे चैतन्य, उत्साह, आनंद, हर्ष.
Ganpati Bappa Photo |
अश्यातच आम्ही एक-एक करत देखावे बघत जात होतो. तेवढ्यात पंचवटीतल्या काळाराम मंदीराच्या दक्षिण दरवाज्याजवळच्या एका देखाव्याकडे माझं अचानकच लक्ष गेलं. गणपती डेकोरेशन |ganpati decoration
एक स्ञी झोपडीतुन धान्य घेऊन येते व दारी आलेल्या वासुदेवाला ते धान्य देते. त्याच वर्षी शाळेत मी १५ ऑगस्ट ला सांस्कृतिक कार्यक्रमात वासुदेवाच्या गाण्यावर नृत्य केललं होतं, ज्यात मला प्रथम बक्षिस मिळालं होतं. त्यामुळे तो देखावा बघायची उत्सुकता अधिक वाटली. मी आमच्याच वाड्यात रहाणार्या शामचा हात ओढत, कुणालाही न कळत तिकडे निघालो. ganesh chaturthi decoration
अगदी गर्दीतुन वाट काढत पुढे जाऊन तो देखावा मनसोक्त पाहिला. तोपर्यंत लक्षातच नाही आलं कि घरचे सगळे आले का? आहेत का? नंतर भानावर येऊन मी त्याच रस्त्यावर २/३ चकरा मारल्या. कुणीच दिसेना, सगळे अपरिचित चेहरे.तेव्हा मला माझा आगाऊपणा लक्षात आला. माझी व घरच्यांची चुकामुक झाली होती. शामही केव्हा माझ्या शेजारुन निसटला हेही मला समजलं नाही.
क्षणभर काय करावं ते सुचेना????
तेवढ्यात एक पोलिस दिसले. सरळ त्यांच्याकडे गेलो अन् सांगितलं.......
"अहो पोलिस काका मी हरवलो."
मी असं बोलल्यावर ते अगोदर हसले, पण माझा रडवेला चेहरा पाहुन म्हणाले, "थांब हं, आपण शोधु तुझ्या घरच्यांना. माझा हात घट्ट पकडुन ते मला काळाराम मंदिराच्या मुख्य दरवाज्याजवळ घेऊन गेले. तिथे असणार्या लाऊड स्पिकरवर ते सुचनेद्वारे सांगत होते.
माझं नाव पुकारुन,
".....असा एक मुलगा हरवलाय, त्याचे कुटुंबिय जिथे कुठे असतील त्यांनी येऊन त्याला घेऊन जा."
कसलं काय? बराच वेळ वाट पाहुनही कुणी येईना. बरं! मी हरवलो हे माझ्या घरच्यांनाही बर्याच उशीराने जाणवलं. तोपर्यंत ते बरेच पुढे निघुन गेले होते. नंतर शोधाशोध सुरु झाली.
आई-आजीच्या डोळ्यांमधुन अश्रुरुपी गंगा-यमुना दुथडी भरुन वाहु लागल्या. बराच वेळ शोधुनही माझा पत्ता लागेना. त्यात घरी गंगापुरला यायची शेवटची बस रात्री ९:१५ वाजेची असायची. ही बस गेली तर १० ते १२ किलोमीटर पायी जाण्याशिवाय पर्याय नाही.
पप्पा ड्युटी करुन व २/३ पुजा करुन दमलेले.
शेवटी सर्वानुमते "पंकज सापडला तर बघु नाहीतर पाहु नंतर काय करायचं ते..
"आधी शेवटची बस पकडुन घरी जाण्याचा त्या सगळ्यांचा निर्णय झाला.
Ganpati images |
इकडे पोलिस काका बिचारे सुचना करुन, ओरडुन थकले, तरी कुणी मला घ्यायला येईना. शेवटी ते मला घेऊन जवळच्याच सरकारवाडा पोलिस स्टेशनला आले. गर्दी तुफान, त्यात पोलिस कर्मचार्यांना बंदोबस्ताची ड्युटी होती.
त्यांनी माझी सगळी विचारपुस करुन म्हणाले, "उद्या सकाळी आम्ही तुला घरी नेऊन सोडु. आता शक्य नाही. कारण, बंदोबस्त आहे व आमची माणसंही कमी आहेत."
इतक्या वेळ शांत बसलेलो मी तेव्हा मात्र त्या पोलिस स्थानकांत रडुन ओरडुन थैमान घालु लागलो. मला आत्ताच घरी नेऊन सोडा म्हणुन हट्ट करु लागलो. अगोदर तिथल्या कर्मचार्यांनी माझी समजुत घातली.
पण,मी ऐकतच नाही म्हटल्यावर एकाने आवाज चढवत मला दम भरला.
"गप्प बस, हात सोडुन पळाला ते पळाला अन् आता हट्ट करतोस."
त्यांचा आवाज ऐकुन मी अगदी जोरदार बेबींच्या देठापासुन म्हणतात तसं भोकाड पसरलं.
इतक्यात निकम नावाचे एक पोलिस कर्मचारी माझ्याजवळ आले, मला उचलुन घेतलं, पोलिस स्टेशनच्या बाहेर आणलं. समजुत घालुन मला शांत केलं. अन् त्यांची ड्युटी संपलेली असुनही मला बाहेर घेऊन आले.
मी त्यांच्या खांद्यावर बसुन सगळी गर्दी न्याहळत बाहेर आलो. त्यांनी मला पाणीपुरी खाऊ घाल, भेलपुरी खाऊ घाल, आईसक्रिम घेऊन दे, पाळण्यात बसवं, हे घे, ते घे करत-करत सगळीकडे फिरवलं.
मग, काय विचारता मंडळी मी त्यात विसरलोच की मी हरवलो आहे.
तोपर्यंत इकडे घरचा सगळा लवाजमा शेवटच्या बसने घरी पोहचला. आई, आजीने रडुन रडुन अख्खी गल्ली डोक्यावर घेतली. आमच्या गल्लीतही मी सगळ्यांचा खुप लाडका. गल्लीतल्या सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचा कार्यक्रम बंद करुन सगळे शोधमोहिमेत गुंतले. बायका आई आजीला समजावु लागल्या.
तेव्हा फोनची सुविधाही तुरकळच होती. मोबाईल तर नव्हतेच. गल्लीत एखाद-दुसर्याकडे Landline फोन होता.
गल्लीतल्याच एकाकडच्या Coin Box फोनवरुन (त्याच्याच फोनमधले सुट्टे पैसे काढुन) शहरातल्या पोलिस स्टेशनला चौकशीसाठी गंगापुरमधुन फोन फिरवायला सुरुवात झाली.
इकडे मी निकम सरांबरोबर सगळे गणपती पाहुन, मजा करुन, मनसोक्त फिरुन आलो. तेव्हा घड्याळात राञीचे ११:३० होत असतील.
मग, त्यांनीच मला विचारलं...
'अरे,तुमच्या घरी फोन आहे का????'
मी म्हटलं घरी नाही, शेजारी नाकिल मावशींकडे आहे. नंबर माझा तोंडपाठ होता.(हि हुशारी म्हणावी कि नशीब ! हुशारी म्हणाल तर मला इतक्या वेळ का नाही सुचली.)
असो, तर!
त्यांनी फोन करुन निरोप दिला, जो नाकील मावशींनी येऊन सांगितल्यावर रात्री १ वाजेला गल्लीतुन काही लोकं मला घ्यायला सरकारवाडा पोलिस स्टेशनला आले. क्षणभर मला असं वाटलं मी खुप मोठा पराक्रम करुन आलो आहे.
दरम्यान, निकम सरांशी माझी छान गट्टी जमली होती. त्यांचा व इतर सगळ्यांचा निरोप घेऊन राञी १:३० ते २ च्या सुमारास आम्ही गंगापुरला पोहचलो. तोपर्यंत सगळी गल्ली जागीच होती.
शेवटी इतक्या वेळ बंद असलेला टेप सुरु करुन नाचत माझं घरी स्वागत झालं.
प्रत्येकजण मला खांद्यावर घेऊन नाचु लागला.
त्यावर्षी पासुन नंतर कित्येक वर्ष आम्ही गणपती बघायला गेलोच नाही. मी मात्र नंतर अधुन-मधुन निकम सर सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना भेटायला आर्वजुन जायचो.
आता मोठे झालो. वय, समज वाढली. मित्रांसोबत अचानक बेत ठरतात. मोबाईल आहे, गाड्या आहेत. पण,ती मजा मात्र त्यावर्षीच्या गणपती विसर्जन बरोबरच विसर्जित(ganpati visarjan) झाली असं नेहमीच वाटतं.
धन्यवाद "गणपती उत्सवातली एक आठवण | गणपती माहिती मराठी | ganesh chaturthi 2023" वाचल्याबद्दल!!
लेखन-: पंकज सविता सुधाकर पाठक