महाशिवरात्री विशेष : अमरनाथ यात्रा अनुभव | Mahashivratri 2024

महाशिवरात्री विशेष : अमरनाथ यात्रा अनुभव | Mahashivratri 2024  बाबा बर्फानी- अमरनाथ गुफा 
(प्रवास वर्णन)

Mahadev-image
Mahadev-image


सत्यम् शिवम् सुंदरम् ........maha shivaratri 2024 | shivratri 2024

शिव हे सर्वसाक्षी, आदि, अनंत असं स्वरुप आहे. भारतात महादेवाची प्रमुख बारा ज्योर्तिंलिंग प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक अद्भुत, रहस्यमयी, विलोभनीय स्थळं आहेत. त्यातीलच एक म्हणजे अमरनाथ गुफा (Amarnath cave). हिमालयाच्या कुशीत असलेलं रोमांचकारी तीर्थक्षेत्र!

जानेवारी २०१५ मध्ये सुमारे २० दिवस कलकत्ता,  बालाजी, हैद्राबाद, सिंहाचलम् ते गोकर्ण महाबळेश्वर असा संपुर्ण दक्षिण भारतातील २५ स्थळांचा प्रवास पुर्ण झाला. ह्या प्रवासानंतर भारताच्या कानाकोपर्‍यापर्यंत मी जाऊन आलो होतो. काही निवडक स्थळं वगळता पुर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असा भारतात चौफेर प्रवास पुर्ण केला होता.

कोणत्याही प्रवासाहुन आल्यानंतर परिचितांपैकी अनेकांना तिथल्या गमती-जमती माझ्याकडुन जाणुन घेण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातुन आल्यानंतर मी शेजारच्या रत्नाताईंकडे प्रवासाबाबत गप्पा करत असतांनाच अमरनाथ (amarnath) प्रवासाचं नियोजन माझ्या मनांत ठरलं. त्याबद्दल त्यांना बोलल्यानंतर त्यांनी लगेचच मला अमरनाथ यात्रेचं (amarnath yatra) आयोजन करणार्‍या उमेश आटवणेंचा नंबर दिला. दरवर्षी गुरुपौर्णिमा ते रक्षाबंधन ह्या पर्वात ४० दिवस ह्या यात्रेचं आयोजन केलं जातं.

नाशिकच्या कपालेश्वर मंदिराजवळ मला माहिती मिळेल असं रत्नाताई म्हणाल्या. त्या क्षणापासुन मनांत अमरनाथ दर्शनाची उत्सुकता जागृत झाली. होळीच्या दिवशी उमेश भाऊंना फोन करुन भेटायला गेलो. होळीची तयारी करता-करता भाऊंनी अमरनाथ प्रवासाबद्दल मला अतिशय सखोल माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता प्रवासाची बुकींग करुन मी घरी आलो. दरम्यान, प्रवासाबाबत अनेक सुचना व इतर माहितीसाठी मी त्यांच्या संपर्कात होतो.

अमरनाथ जाण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी करुन ३ प्रवेशपत्र, पास मिळवायचे असतात. येस बँक, जम्मु & कश्मिर बँक, पंजाब नॅशनल बँक व अनेक ठिकाणी हि सुविधा असते. रेल्वे बुकींगपासुन ते पास मिळवण्यापर्यंत सगळी तजवीज उमेश भाऊंनीच केली. ९ जुलै २०१५ रोजी कपालेश्वर मंदिरांत संकल्प व अभिषेक पुजा करुन आम्ही दिल्लीसाठी रवाना झालो. अर्थातच, ह्या संकल्प व अभिषेक पुजेची सेवा उमेश भाऊंनी मला दिली. प्रवास सुखरुप होण्याकरिता कपालेश्वराला प्रार्थना करुन बम बम भोलेच्या गजरांत जवळपास २५० लोकांचा आमचा समुह अमरनाथ यात्रेला मार्गस्थ झाला. नेहमीप्रमाणे घरांतुन एकटांच निघालो असलो तरी दिल्लीला पोहचेपर्यंत अनेक सहप्रवाश्यांशी छान ओळख झाली.

संपुर्ण एक दिवस प्रवास करुन आम्ही दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचलो. इथुनच रात्री जम्मु तवी एक्सप्रेसने आम्ही रात्रभर प्रवास करुन जम्मुला पोहचलो. अमरनाथ प्रवासाचे दोन मार्ग आहेत. एक अनंतनाग-पहलगाँव मार्गे आणि दुसरा बालटाल मार्गे आहे. बालटाल कडुन १४ किलोमीटरचे अंतर असले तरी हे अधिकच धोकादायक आहे. पहलगाँव मार्गे ३ दिवसांचा प्रवासाचा टप्पा असला तरी निसर्गाचा अद्भुत नजारा आपल्याला बघायला मिळतो.

पहिला दिवस चंदनवाडी ते शेषनाग, दुसरा दिवस शेषनाग ते पंचतरणी व तिसर्‍या दिवशी पंचतरणीहुन अमरनाथ दर्शन करुन बालटाल असा हा क्रम असतो. ४० किमीचा हा खडतर प्रवास आहे. मी प्रवासासाठी हाच मार्ग निवडला होता. कारण, निसर्गाशी असणारा ऋणानुबंध मला अधिक घट्ट करायचा होता. जम्मु हे उत्तर रेल्वेचं शेवटचं स्टेशन आहे.

जम्मुला जाण्यापुर्वीच रिमोट एरिया असल्याने आपले सिमकार्ड बंद होतात. जोखमीचा प्रवास व मी एकटांच असल्यांने घरची सगळी मंडळी चिंताक्रांत होणार. त्यामुळे, तिथेच जम्मुचं एक नविन सिमकार्ड खरेदी केलं. सरकारी बसने जम्मु ते अनंतनाग असा आमचा प्रवास सुरु झाला.

भोले कि फौज करेगी मौज, भोले तेरा रुप निराला अमरनाथ में डेरा डाँला अश्या गर्जनेंत उंच-उंच पर्वतरांगा, नागमोडी वळणं, अनेक हिमशिखरं पार करत उधमपुर, रामबन, बनिहाल असा मार्ग क्रमत तवी, चिनाब, झेलम ह्या नद्यांच्या विस्तीर्ण जलाशयाने साथ संगत करत अनेक अरुंद पुल, पर्वतीय क्षेत्रांतुन बस धावत होती. एव्हाना सगळ्या प्रवाश्यांचा एकमेकांशी चांगलाच परिचय झाला असल्याने गाण्याच्या भेंड्या खेळतांना जणु हिमालयाचा सारा परिसर संध्या संत, मेघा पाटील, तन्वी पाटील, जितु सरोदे, अतुलभाऊ, गजानन आहिरे, माधुरी आहिरे, राहुल निमसे, कल्पना भुजंग असा आम्ही सगळ्यांनी दणाणुन टाकला होता.

प्रकृती व परमात्मा असा अनोखा संगम असणारा हा प्रवास जितका भितीदायक तितकाच रोमहर्षक असल्याची जाणीव आपल्याला पावलागणिक झाल्याशिवाय राहत नाही. माझे काॅलजचे मित्र सागर कुलकर्णी, रोहित बत्तासे, महेश कुडके, रोहन कोठुळे यांची ह्या प्रवासामध्ये काॅलेजनंतर खुप वर्षांनी भेट झाली.

कश्मिरला धरतीचा स्वर्ग का म्हणतात? हे ह्या प्रवासांत प्रत्येक क्षणी अनुभवता येतं.

जम्मुहुन निघालेला आमचा ताफा अनंतनागकडे सरकत होता.उधमपुरच्या घाटांत अख्खी रात्र आमची बस थांबवली गेली होती. सुरक्षेच्या दृष्टीने खाली उतरण्यासाठी परवानगी नव्हती. दुसर्‍या दिवशी अनंतनागला पोहचतांच मिल्ट्री कॅम्पमध्ये निवासव्यवस्था होती. अनंतनागला अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते. समुहाने बाहेर पडण्याची पुर्णतः बंदी असते. कारण, हे सिमेवरील मोक्याचं ठिकाण आहे. निवासव्यवस्थेतच भजनाची साद रंगवत एक दिवस पुर्ण झाला. अमरनाथ गुफेजवळ प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने दोन दिवस आम्हांला अनंतनागलाच थांबावं लागलं. सुनंदा मेन्सी, आदित्य मेन्सी, मेन्सी काका व अजुन इतर सहप्रवाशी असा आमचा वेगळाच ग्रुप तयार झाला. अगदी नाशिकला परत येईपर्यंत आम्ही सोबतच होतो. 

ठरल्याप्रमाणे अनंतनाग ईथुनच काही प्रवासी बालटालकडे गेले. अन् आम्ही पहलगाँवला आलो. एका बॅगमध्ये काही निवडक साहित्य सोबत ठेवुन इतर साहित्य बसमध्येच ठेवावं लागलं. कारण, पुढे ३ दिवस आम्हांला हेच साहित्य पाठीवर घेऊन प्रवास करायचा होता. पहेलगाँवला पुन्हा एकदा कडक शिस्तीत सगळ्या प्रवासी साहित्याची व आमची तपासणी झाली. पहेलगाँवला पोहचायला उशीर झाल्याने पुढच्या प्रवासाची परवानगी नव्हती. त्यामुळे तिथेच लष्करी तंबुमध्ये आमचा मुक्काम झाला. भारतीय लष्कर हा संपुर्ण प्रवास सुरक्षित व सुखमय होण्यासाठी अहोरात्र तप्तर असतात. त्याकरिता शिस्त व नियमांचं पालन करणे ही आपली जबाबदारी असते.

Amarnath-Temple-Amarnath-Cave-pic
Amarnath-Temple-Amarnath-Cave-pic


अनेक भाविक लंगरच्या (अन्नछत्र) माध्यमांतुन अन्नदानाचं कार्य करतात. विविधांगी पदार्थांची मेजवानी हि प्रत्येक यात्रेकरुसाठी पर्वणी असते. समुद्रसपाटीपासुन उंचावर असल्याने वैद्यकिय सुविधाही उपलब्ध असतात.

देवाधिदेव महादेव यांच्या ह्या स्थळाची आख्यायिका तितकीच चित्तथरारक आहे. पौराणिक कथेनुसार नारद पार्वती मातेला विचारतात कि शंकरांनी गळ्यांत मुंडमाळा का धारण केली आहे??? शंका उत्पन्न होताच पार्वती देवी ह्याबाबत भोलेनाथांना विचारतात. त्यावेळी, सदाशिव सांगतात कि ही सगळी तुझीच डोकी आहेत. तुझे जितके जन्म तितकी ह्यांची संख्या आहे. त्यावर माता म्हणते कि माझा मृत्यु होतो. तुमचा नाही. नव्या जन्मांत आपली अर्धांगिनी होण्यकरिता मला तपश्चर्या करावी लागते, असं का????ह्यावर भोलेनाथ अमरकथेचा उल्लेख करतात.

अमरकथा ऐकणारा अमर होतो हे ऐकुन हि अमरकथा ऐकण्यासाठी देवी पार्वती शंकरांना आग्रह करतात. पार्वतीशिवाय ही कथा कुणीही ऐकु नये ह्याकरिता शंकर-पार्वती निर्जन स्थळाच्या शोधांत निघतात. व पहेलगाँवला येतात. ह्याच ठिकाणी भगवान आपले वाहन नंदीचा परित्याग करतात. म्हणुन बैलगाँव असं प्राचीन नाव असणार्‍या ह्या परिसराला तेव्हापासुन पहेलगाँव असं संबोधलं जातं. पहेलगाँव ते चंदनवाडी निलगंगा लागते. क्रिडा करतांना महादेवाचे तोंड पार्वतीच्या डोळ्यांना लागल्याने चेहर्‍याला लागलेलं काजळ महादेवांनी स्वच्छ करण्यासाठी ह्या पाण्याने तोंड धुतलं तिच हि नीलगंगा.

Pahalgam-Nature
Pahalgam-Nature


चंदनवाडी ह्या ठिकाणी महेश्वरांनी चंद्राला जटांतुन मुक्त केल्याने चंदनवाडी तर गळ्यांतील नागराजांना मुक्त केलं त्याठिकाणाला शेषनाग असं म्हटलं जातं. पुढे उमा-महेश्वराने जिथे तांडव नृत्य केले व महादेवांच्या जटांतुन गंगा मुक्त होतांच पाच धारा प्रवाहित झाल्या. तसेच, अग्नि, पृथ्वी, वायु, जल, आकाश ह्या पाच तत्त्वांचा परित्याग केला ते ठिकाण पंचतरणी म्हणुन ओळखलं जातं. असा प्रवास करत दोघेही गुफेजवळ पोहचले. अमरकथा ऐकतांना हुंकार देत रहा अशी सुचना करुन देवांनी डोळे बंद करुन मातेला अमरकथा सांगण्यांस सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या आसनाखाली मृगछाया कबुतराचे अंडे होते त्यातुन पिलाची निर्मिती झाली.

कथा ऐकतांना माता पार्वती निद्राधीन झाली. मात्र, हुंकाराचा आवाज येत असल्याने देवाधिदेव कथा सांगत होते. कथा पुर्ण होतांच त्यांनी डोळे उघडुन पाहिले तर पार्वती देवी झोपल्या होत्या. मग,हुंकार कोण देत होतं??? हा शोध करताच मृगछाया कबुतराचे पिल्लु महादेवांच्या दृष्टींस पडले. अमरकथा ऐकल्याने हे पिल्लु अमर झाले. हे पिल्लु महादेव वध करतील ह्या भितीने पळाले. व्यासपत्नी जांभाई देत असतांना त्यांच्या शरिरांत गेले. चार वेद, अठरा पुराणांचे ज्ञान असणारे हे कबुतर पुढे शुकदेवाच्या रुपांत प्रकट झाले. एकदा ऋषी-मुनींनी आग्रह केल्यानंतर अमरकथेवर व्याख्यान देत असल्याचे बघुन महादेवांनी त्यांस शाप दिला. अश्या अनेक पौराणिक कथा आहेत.

पहलगाँवहुन वाहनाने आम्ही चंदनवाडीला आलो त्यावेळी सुर्याची कोवळी किरणं उंच उंच अश्या सदाहरित वृक्षांवर पडली होती. बर्फाच्छादित प्रदेश असल्याने थंडीची लाट अंग रोमांचित करत होती. खोल दरी, खडकाळ भागांतुन निरनिराळी वळणं घेत अनेक जलधारांचा खळखळाट कानी पडत होता. पक्ष्यांचा नादमधुर चिवचिवाट कर्ण तृप्ती देत होता. अनेक लोक खेचर, घोडे, पालखी, पिठ्ठु अश्या साहाय्याने प्रवास करत होते. आम्ही मात्र, शिव-सखीच्या पदकमलांनी पावन झालेल्या पाऊलखुणा शोधत पायी प्रवासाचा पर्याय निवडला.

दाट धुकं, निरभ्र आकाश, विशाल बर्फांची पर्वतरांग, उंचावर कोसळणारे धबधबे व अरुंद लाकडी पुलावरुन तर कधी असंख्य दगड-धोड्यांतुन निर्सगाला साक्ष ठेवत आमचे पाऊल पडत होते. समुद्रसपाटीपासुन हळुहळु उंचावर जातांच आॅक्सिजनची कमतरता जाणवत होती. पिसु टाॅप हा सुरुवातीचा अतिशय कठीण टप्पा, त्यांत गणेश टाॅप अजुनच बिकट आहे. पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल होता. दगडांहुन भराभर पाय सटकत होते. एका वळणावर तर एक घोडं उधळलं. त्याचा धक्का बसतांच मी धाडकन एका दगडावर आपटलो. सुदैवाने फार काही लागलं नाही. मात्र, त्यामुळे पायांची चालण्याची गती मंदावली. दुपारपर्यंत आम्ही शेषनागला आलो.

सारं शरीर जणु निष्क्रिय जाणवतं होतं. पायांत त्राण शिल्लक नव्हता. सर्वत्र काळाकुट्ट अंधार होता. आकाशांकडे बघितलं तर चंद्राच्या शितल प्रकाशाबरोबर लुकलुकणारं चांदणं ह्या हिमवादीची सौंदर्यता खुलवत होतं. थंडगार तंबुमध्ये जमिनीवर पाठ टेकतांच निद्रादेवी प्रसन्न झाली. जम्मुला नविन सिमकार्ड घेतल्याने घरी संपर्क होत असायचा. मात्र, उंचावर जात असतांना हे कार्डही सोनमर्ग पर्यंत बंदच होतं. प्रवास नियोजनांतील २-३ दिवस बर्फ पडत असल्याने वाया गेले होते. पुढचं नियोजन लक्षात घेऊन उमेश भाऊने शेषनागपासुन पुढचा प्रवास घोडसवारीद्वारे करण्याची सगळ्यांनाच सक्ती केली.

सर्वत्र बर्फच बर्फ व अनेक चढउतार असल्याने प्रवासाचा प्रत्येक टप्पा काळजाचा ठोका चुकवत होता. अचानक, बर्फाच्या खोल खड्यात घोड्याचा पाय अटकताच आता आपण पडलोच असं जाणवत असतांनाच ते पशु पुन्हा नवी वाट शोधत मार्गक्रमण करत होतं. टपटप घोड्याच्या टापांबरोबर पंचतरणीर्यंत पोहचलो. पण, इथुन पुढे गुफेपर्यंत जाण्यासाठी असणारी वाट अधिकच बिकट होती. अरुंद रस्त्ता, बाजुला खोल दरी असतांना कुणाचाही थरकाप उडणांरच.

एका वळणांवर तर हा सगळा नजारा पाहुन मला चक्कर आल्याने मी घोड्यावरुन पायउतार झालो. माझी पाठीवरची बॅग घोडेवाल्याकडे देऊन मी पायी चालु लागलो. पायातील बुटांना ग्रीप नसल्याने बर्फाळ प्रदेश येतांच पाय घसरुन मी कुठे जात होतो हे भोलेनाथांस ठाऊक. मात्र, श्रद्धेचा विश्वास व भक्तीची कास धरत मी पुढे जात होतो. अखेरीस, समुद्रसपाटीपासुन सुमारे १६००० फुट उंचीवर विशाल, विस्तीर्ण अशी अमरनाथ गुफा नजरेच्या टप्प्यात येतांच सगळा थकवा, भिती नाहिशी झाली. डमरुधारी सदाशिव एवढ्या उंचावर कसे आलेत??? शिवोहम् हा एकच नाद अंर्तमनातुन निनादत होता.

थंडगार पाण्याने अंघोळ करुन शुर्चिभुत होतांच, कपाळी भस्माचं त्रिपुंड रेखुन हर हर महादेव,ऊँ नमः शिवाय असा मृत्युंजयाचा धावा करत मी मंदिराजवळ (amarnath temple), गुफेजवळ आलो. ८ ते ९ फुट उंच बर्फाचं शिवलिंग (amarnath shivling) , ५१ शक्तीपिठांपैकी एक पार्वतीचं पीठ व गणेशपीठ बघतांच नतमस्तक होतांना अश्रुंची फुलं उधळली गेली नसतील तरच नवल. कृतार्थ भाव रोमांरोमांतुन सळसळत होता. भस्म शृंगारी, नागजटाधारी, बाबा बर्फानीचा आशिर्वाद घेऊन मी बालटालकडे कुच केली.

गर्दीत चुकामुक झाल्याने सोबतचे प्रवासी कुठे होते हे मला माहित नाही. परतीचा प्रवास प्रचंड भयावह जाणवला. बर्फाच्या थरांवरुन जातांना खुपच दमछाक होत होती. तीव्र उतारामुळे घसरुन दरीत कोसळतो कि काय?असे विचित्र विचार मनात येतांच अंगाचा थरकाप उठत होता. बालटालला पोहचल्याशिवाय पर्याय नव्हता. दिवस मावळतीला झुकत होता. 

भितीचं सावट मनांत दाट पसरत होतं. आॅक्सिजन कमतरतेमुळे श्वास घ्यायला त्रास होत होता. एका ठिकाणी तीव्र उताराहुन सरकतांच २-३ लोकांनी मला पटकन खेचलं. माझं डोकं जड झालं.डोळ्यापुढे अंधारी आली. त्यापुढचा चार साडेचार किमीचा प्रवास कसा केला माझं मलाच भान नव्हतं. ज्या लोकांनी घसरतांना मला हात दिला त्यांनीच उचलुन मला पुढे आणलं. एका लंगरमध्ये थोडा नाश्ता केल्यानंतर मला जरा हुशारी वाटु लागली.

दोंडाईचा, चाळीसगाव, जळगाव अश्या परिसरांतुन आलेल्या ह्या लोकांबरोबरच माझा पुढचा प्रवास सुरु झाला. आपली मराठी माणसं भेटल्याने बोलता-बोलता मनातील भिती त्या हिमवादीमध्येच लुप्त झाली. पावलांचा वेग वाढला त्याबरोबर गप्पांच्या फैरी माझ्याकडुन वाढल्या. पाऊस येतांच एखाद्या कड्या-कपारीचा आसरा घेऊन शिडकावा बंद होतांच आम्ही पुन्हा चालत होतो. कधी आयुष्यातील सुखद-दुःखद प्रसंग सांगत तर काही क्षण हास्य विनोद करत उरलेला १० किमीचा प्रवास पुर्ण करुन कधी बालटाल गाठलं हे समजलंच नाही. काही क्षणापुर्वी भेटलेल्या ह्या सगळ्यांबरोबर युगानुयुगे माझा प्रवास चालु आहे ही भावना तेव्हा मनांत आली.

मुक्कामाचा तंबु जवळ येतांच गळाभेट घेऊन एकमेकांचे नंबर शेअर करुन आम्ही आपआपल्या तंबुत येऊन विश्रांती घेतली. यापैकी विशाल गिरासे हा मित्र आजही माझ्या संपर्कात आहे. निवासव्यवस्थेजवळ पोहचतांच धो-धो पाऊस बरसु लागला. आसमंतच्या स्वच्छंदीपणांत सारी धरा ओलिचिंब होत न्हाऊन निघाली. खुप दमल्याने कधी झोप लागली ते समजलं नाही. सकाळ उजडतांच काश्मिर की वादियाँ डोळ्यांत आठवण रुपाने साठत होत्या. बरेच, सहप्रवासी अजुनही परत आलेले नव्हते. केव्हाही पुन्हा जोरदार पाऊस येईल असा संकेत निसर्गराजा देत होता. इतर लोकांची खुप वेळ वाट बघुन चार बसपैकी आमच्या तीन बस सोनमर्ग, श्रीनगर मार्गे कटरा वैष्णौ देवीकडे रवाना झाल्या. उमेशभाऊ उर्वरीत प्रवाश्यांना घेऊन नंतर कटरा पोहचणार होते.

साधारणपणे १०० किमी पुढे येतांच बालटालला प्रचंड पाऊस पडल्याने, ढगफुटीमुळे खुप नुकसान झालं, दरड कोसळल्या, ज्या तंबुत आम्ही रात्रभर विश्राम केला तेदेखील वाहुन गेल्याची खबर आम्हांला समजली. आम्ही सुखरुप होतो. पण, मागे राहिलेल्या उमेशभाऊ व इतर प्रवाश्यांचं काय???? विचारच सहन होईना. रिमोट एरिया असल्याने कुणाशी संपर्कही होत नव्हता.

हे त्रिपुरारी, सांब सदाशिवा माझे सारे प्रवासी कुशल-मंगल असु दे म्हणुन मी मनोमन त्या करुणाकराला प्रार्थना केली. न्युजमध्ये हे सगळं वर्णन ऐकल्याने घरी आई, पप्पा, ताई सगळेच माझी काळजी करत होते. श्रीनगरच्या पुढे आल्यानंतर सिमकार्ड पुन्हा सुरु झाल्यावर मी घरी फोन केल्याने सगळे निर्धास्त झाले.श्रीनगरमार्गे रात्रभर प्रवास करुन दुसर्‍या दिवशी सुर्योदयच्या वेळी आम्ही कटराला पोहचलो.

वैष्णो देवीचं दर्शन करण्याचा दुसर्‍यांदा योग आला. तीन दिवसांनी उमेशभाऊ एकटेच कटराला आले. इतर प्रवासी सुखरुप असुन ते वेळ नसल्याने परस्पर अमृतसरला गेल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्या तीन दिवसांत ते ज्या त्रासांतुन गेले ते ऐकुन साक्षात मृत्युच्या दाढेतुन परत आल्याचं जाणवत होतं. शिवखोडी हे स्थळ बघुन आम्ही अमृतसरला आलो. 

मागे राहिलेल्या मेघा काकु, तन्वी,जितु, सुनिल भाऊ यांनी अमृतसराला भेटल्यानंतर जो विदारक प्रसंग सांगितला तो ऐकुन आम्ही सारेच सुन्न झालो. कारण, प्रत्यक्ष मृत्युचं तांडव त्यांच्या नजरेसमोर चालु होतं. मात्र, भोले भंडारीच्या कृपेने सगळे सहीसलामत असल्याचं समाधान होतं. अमृतसरला ह्या सगळ्यांना बघतांच आमच्या गंग-जमुना अश्रुंच्या रुपांत प्रवाहित झाल्या. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट देऊन रात्रीच्या ट्रेनने आम्ही नाशिककडे निघालो.

९ जुलैला सुरु झालेली हि सफर अनेक रोमहर्षक, भयावह, बिकट परंतु तितक्याच अविस्मरणीय आठवणींसह २२ जुलैला पुर्ण झाली. खरं तर निलकंठ उमाकांत शिवानेच आमचा प्रवास सहज,सुंदर केला असं म्हणायला हरकत नाही.


म्हणुनच सगळे म्हणतात......"भोले तेरा रुप निराला, अमरनाथ में डेरा डाँला."

तुम्हा सर्वांना 'महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा' happy mahashivratri !!

धन्यवाद, 'महाशिवरात्री विशेष : अमरनाथ यात्रा अनुभव | Mahashivratri 2024' वाचल्याबद्दल !!

लेखन-: पंकज सविता सुधाकर पाठक. (नाशिक)

Remedies to Success ( यशाचे मार्ग )

आम्ही Remedies to Success, ह्या ब्लॉगची सुरुवात शैक्षणिक माहिती, प्रेरणादायी लघुकथा इ. मांडण्यासाठी वा तुमच्यापर्यंत सामायिक करण्यासाठी केली आहे. We began to work as Remedies to Success, To entertain you with education information, Inspirational short stories.

Post a Comment

If you guys have any doubts, Please let me know and please provide your valid E-Mail!

Previous Post Next Post

EducationGalaxies.com, Best Blogger Templates, how to create a payoneer account, how does SEO work on google, affiliate marketing, how to create a free virtual credit card, how to create HTML sitemap page, how to start a blog and earn money, how to start a blog, search engine optimization, SEO, how to add swipe up link on facebook story, best web hosting in nepal, best web hosting, best domain name registrar in nepal, best domain registrar in nepal , best domain name registrar, best domain registrar, best domain registration company, best domain name registration company , best domain name registration company in nepal, best domain registration company in nepal, best domain provider company, best domain provider company in nepal, cheap domain provider company in nepal, cheap domain provider company, best web hosting company in nepal, how to register a domain in nepal, how to register a domain, how to buy a domain in nepal, how to buy a domain, email marketing, indian apps list, indian apps, list of indian apps,html editor,image compressor,image optimizer,html color code,logo generator,favicon generator,robots.txt generator,xml sitemap generator,privacy policy generator,word counter,character counter,keyword density checker,youtube video thumbnail downloader,alexa rank checker, how to write math equation in blogger, how to insert math equation in blogger, how to add math equation in blogger, how to write math equation in blogger post, how to write math equation in blogger article, how to insert math equation in blogger post, how to insert math equation in blogger article, how to add math equation in blogger post, how to add math equation in blogger article, codecogs equation editor, copyright free images, qr code generator, movies details, message encryptor, youtube video downloader, facebook video downloader, instagram video downloader, twitter video downloader, image converter, jpg converter, png converter, gif converter, gdrive direct link generator, gdrive direct download link generator, google drive direct download link generator, google drive direct link generator, keyword generator, internet speed checker, percentage calculator, keywords generator, love calculator, url encryptor, html to xml converter, gradient css color code generator, css previewer, html previewer, meta tag generator, meta tags generator, disclaimer generator, dmca generator, terms and conditions generator, terms & conditions generator, age calculator, url shortener, link shortener, terms of service generator