जागतिक टपाल दिन 2023 | international post day 2023 | जागतिक टपाल दिन माहिती
दिनांक - ०९/१०/२०२३
लिहिण्यास कारण की,
जागतिक टपाल दिवस 9 ऑक्टोबर,
जागतिक टपाल दिन 2023 | international post day 2023 आम्ही लहान असताना खाकी पोशाखात एक व्यक्ती सायकलीची घंटी वाजवत यायचा. होय पोस्टमन काका, गल्लीच्या सुरुवाती पासून ते शेवटापर्यंत आम्ही त्यांच्या मागेमागे धावत सुटायचो. आम्हालाही तितक्याच कमालीची उत्सुकता असायची, की कोणाचे पत्र आले असेल? संदेसे आते है, गाणे का इतके विशेष? हे आजकालच्या पिढीला काय कळणार? पोस्ट ऑफिस, टपालपेटी ह्या गोष्टी जागोजागी असायच्या, आता मात्र खंत अशी की त्या कुठे बघायला मिळत नाही. उत्सुकतेने येणाऱ्या पत्रांची जागा आता इ-मेल ने घेतलीय, पण पत्र वाचण्याच्या भावनांची नाही घेऊ शकत.
world post day is celebrated on 9th October
post-card-old |
पत्र वाचनाची जबाबदारी पण पोस्टमन काका अनेकदा स्वीकारायचे. कोण्या एक म्हातारीचा मुलगा दूर ठिकाणी सैन्यात भरती होतो. त्याच्या पत्राच्या आनंदाहुन अधिक आनंद तिच्या चेहऱ्यावर येईल का ? म्हाताऱ्या पालकांना दूर सोडून गेलेले त्यांचे मुलं, तरीही ते आई वडील आपसूक त्यांच्या कडून केवळ एका संदेशाची अपेक्षा करत असतात, पोस्टमन काकांना दररोज विचारणा करतात, की बाबा आलंय का रे कुठलं पत्र आमच्यासाठी?ह्या गोष्टी अनुभवणे, त्यांच्या आठवणी चेहऱ्यावर अनाकलनीय हसू आणते. कुठं तरी हरवल्यासारखं वाटतं, आठवणी तशाचं मनात स्तब्ध आहे.
'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे पत्र वाचून दाखवतो. अश्याच आई वडिलांना पत्र वाचून दाखवले की त्यांच्या चेहऱ्यावर लाखमोलाचे हसू येते. माझ्या आठवणीत तरी असे पोस्टमन काका नाही पण, एक संवादाला जोडणारे मात्र अनेक आहेत. संभाषणात भांडण असो वा तो गोड असो पण उत्तर प्रतिउत्तर तितकेच महत्वाचे असते. हे सर्व ज्या माध्यमातून होते ते टपाल! एकंदरीत पंधरा पैशांच्या त्या पत्रातून परमानंद मिळायचा.
शाळेत असताना एक उपक्रम मराठीच्या तासाच्या दरम्यान राबविला गेला होता. एक पत्र घेऊन शाळेत बोलावले आणि आईला पत्र लिहायचे होते. प्रिय आईस, ते तुझा लाडका पर्यंत पत्र लिहिले, नाव पासून तर गावापर्यंत ( पत्ता) अक्षर मात्र जेमतेमचं होते. शिक्षिकेने सांगितल्याप्रमाणे पत्र चोख उतरवले होते खरे! आईला कसे वाटेल? हा प्रश्न तर होताच. मग तो पहिला अनुभव, टपाल तिकीट आणणे, टपालपेटी मध्ये ते आपण लिहिलेले पत्र टाकणे. आई कौतुकाने इतरांना सांगत होती, पत्राबद्दल! अक्षर दूरचं पण तिला पत्रामागच्या भावना समजल्या होत्या किंबहुना तिने समजून घेतल्या होत्या. जागतिक टपाल दिन माहिती | जागतिक टपाल दिन २०२३
कदाचित हाच विषय २०-३० वर्षांआधी मांडला असता तर कोणास ठाऊक होते टपाल सुविधा पडद्याआड जाताना बघावी लागेल. भावना, दुःख, यातना, आनंद इत्यादी गोष्टी अनुभवण्याची सर ई-मेल ला मुळीच नाही. पोस्टमन काकांचा पाठी मागे फिरून आपल्या मामाचं पत्र मिळविण्यात, आपल्या आत्याची खुशाली ऐकण्यात जो आनंद होता, तो आनंदही आज टपालासोबत नाहीसा झाला. पोस्टाने येणारे संदेश जरा वेळ मात्र घेतात पण त्याची उत्सुकता काही वेळा आनंदास पात्र ठरते. दुःखाची वार्ता अनपेक्षित वेळ घेऊन जाते ही एक कमतरता ठरू शकते. मात्र टपाल/पोस्ट ची सुविधा आता कालबाह्य जरूर वाटते. कारण जगाच्या वेगापेक्षा पोस्टचा वेग खूप कमी आहे. काही गोष्टी अशाही असतात ज्या वेळेत आणि त्याचं वेळेत मिळणे गरजेचे असते. ती वेळ वेगळी होती, जेव्हा वेग नाही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. टपाल आठवण
अनिकेत कुंदे