जीवनाची साखळी | Life chain | आपण अनुभवणाऱ्या स्वभावांची साखळी
|
Chain |
जीवनाची साखळी | Life chain | आपण अनुभवणाऱ्या स्वभावांची साखळी | जर हा विषय पायातल्या पैंजनांविषयी असता तर विषयावर जरा गहन बोलता आले असते अस माझं काहीसं मत नाही. कुणी तरी उदार मनाने आपली केलेली मदत देखील आपल्या डोईवर कागदपत्रांविना असलेले कर्ज वाटु लागते.
कुणी जर त्याच्या मतलबासाठी तुमची मदत करत असेल तर त्याची देखील कोणी अशीच मतलबासाठी मदत करेन याची शक्यता टाळता येत नाही. कुणी जर निस्वार्थी मनाने तुमची मदत करेल त्याला देखील तसंच प्राप्त होईल त्याचंही पारडे निस्वार्थीपणामुळे जड होईल याचीही शक्यता नाकारता येत नाही.
थोडक्यात काय तर "पेराल तसे उगवेल" पण ते देखील तुम्हाला साखळी च्या रूपाने अनुभवायला मिळेल. आज असे तर उद्या तसे दररोज हा दिवस सूर्याच्या पूर्वेकडील आगमनानेचं सुरू होतो.
प्रेम, क्रोध, लोभ, कपट, निर्दयी, उदार, निस्वार्थी, स्वार्थी असणारे माणसं तुम्हाला पदोपदी मिळतील पण असेच गृहीत धरा की आज प्रेम करणारी असतील तर उद्या लोभी वृत्ती असलेली रक्तपिपासु माणसे तुमच्या दारात असणारच. आज जर निस्वार्थीपणा घेऊन जरी तुम्ही जगत असाल तरी कोणी स्वार्थी माणसाची तुमच्या निस्वार्थीपणाला ठेच लागणारच.
|
Neck Chain |
गळ्यातील साखळीत देखील सुरुवातीची बाजु अन शेवटची बाजु अखेर मिळतेचं थोडक्यात काय तर तुम्ही मनात पाप किंवा पुण्य घेऊन गोष्टी हाताळत असाल तर माणसाच्या हर एक स्वभावाचा तुम्हाला सामना करणं अनिवार्य आहे.
सांगायचंच झाले तर प्रेम आणि आवड या गोष्टी काही जणांसाठी समानार्थी असतील पण आवड मनात असते आणि हृदयात प्रेम, प्रेमात आणि आवड मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आवड म्हणजे ती गोष्ट जिच्यावर आपण प्रेम नाही करत पण तिला विसरनेही कठीण होते अन काही वेळ सरला की तिचा मोह कमी होत जातो.
पण प्रेमाचं तस नाही, प्रेमात मोह नसतो,भीती नसते ना नसतो राग!
अवघ्या काही गोष्टी पुरेश्या आहेत हे सविस्तर मांडायला. मी सागर पुण्याला नाशिकहून शिकायला आलेलो, आज माझी सत्र परीक्षा संपवुन घरी जायला निघालो. पण काही कारणास्तव P.M.P.M.L चा संप आजच व्हायचा होता.
भर उन्हात ताटकळत अन आजचं माझा उपवास देखील आहे उपाशी पोटी रिक्षा किंवा कोणत्याही वाहनाची वाट बघत होतो. पुष्कळ वेळ निघुन गेला तरी काही साधन मिळेना. पुरेपुर वाट बघितल्या नंतर अखेर एक व्हॅन येऊन थांबली 'कुठं जायचंय ?' शिवाजीनगर म्हणुन मी ही सांगितलं. २०० रुपये होतील पण मला ही कळत होते की ही पैसे नेहमीच्या रिक्षा किंवा कोणत्याही वाहनाच्या भाड्या पेक्षा दुप्पट आहेत.
मी विनवण्या करून देखील त्यांनी काही ऐकले नाही नाईलाजाने मला जाणेच होते कारण सामान आहे सोबत आणि पाय तुडवत जाणे म्हणजे ऊन बघता अशक्यच!
मी रमेश, तोच ज्याने त्या मुलाकडून भाडं दुप्पट घेतले आज मला माझ्या राहत्या घराचे भाडे घरमालकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये देने बंधनकारक आहे. तो थोड्या वेळात येतंच असेल ' काय रे किती दिवस चकरा मारायला लावणार आहे तु ? ' घरात पाय ठेवताच घरमालकाचा तीव्र खटाटोप कानाला शिवत होता. ते देखील सांगून सांगुन थकले होते. पण काही कारणास्तव मी ही भाडे वेळेवर देऊ शकतं नव्हतो.
मी अनंत रमेशचा घरमालक, तसा माझा चांगला व्यवसाय आहे पुण्यात! सांगायचं झालं तर रमेश च्या घरभाड्याने मला काही एक तोटा नाही पण माझी बायको नेहमी सांगते की तुम्ही भोळे आहात असेच असेल तर हे जग तुमचा फायदा घेत राहील.
खरंतर मी बघतो की रमेश भाडे देतो पण प्रत्येक वेळी त्याला उशीर होतो. मला देखील माहिती आहे की त्याला कधी काही वेळा शक्य होतं नाही इतकी बचत करायला.
मी अलका अनंतची पत्नी, पैसे साठवुन ठेवले पाहिजे या मताची मी नाही पण भविष्यासाठी जपुन ठेवले तर पाहीजे ना? माझे माहेर नाशिकचे, आई वडील आणि भाऊ असा परिवार! माझ्या भावाचा शैक्षणिक खर्च माझे आई वडील उचलु शकत नाही हे मला पूर्ण ज्ञात आहे. मी माझ्या परीने जितकं शक्य होईल तितके त्यांची मदत करत असते.
मी अमित, अलका ही माझी मोठी बहीण, ती मला हवी असणारी हर एक गोष्ट पुरवते. तिला वाटतं मी शिकुन घरची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावें असा माझ्या जिवलग मित्राला देखील वाटत पण मला शिक्षणात अजिबात रस नाही. एक दुचाकी आहे घरी तिने शहर फिरणे हा नेहमीचाच माझा, छंद राहिला आहे.
मी शुभम अमितचा मित्र माझ्याही घरची परिस्थिती अगदीच जेमतेम. मी कित्येकदा अमितला त्याच्या परिस्थितीची जाणीव देखील करून दिली आहे! त्याचे छंद जोपासण्यात तो खुप दंग आहे. त्याला पाहिजे म्हणुन मी घरुन बहुतेकदा खोटं बोलुन पैसे मागवुन घेतले होते. मी त्याला सुधारण्यात अजुन तरी यशस्वी नाही.
|
Bus |
अखेर बसची वाट बघत उभा राहिलो अन त्र्यंबकेश्वरला जाणारी बस मिळाली. नशीब म्हणजे बसायला मोकळी अन खिडकी जवळची जागा मिळणे. कासारवाडी ला आल्यावर एक आजी बसमध्ये चढल्या जवळ येऊन "बसु का रे बाळा?" अशी विचारणा त्यांनी केली. "बसा ना आजी" मी पण होकारार्थी मान हालवत हसत उत्तर दिले.
एकादशी निमित्त आजी आळंदीला जाऊन परत त्र्यंबकेश्वर ला निघाल्या होत्या. त्यांनाही उपवास होता अन मलाही हे आमच्या बोलण्यात कळाले. त्यांच्या कडे साबुदाणा खिचडीने भरगच्च डबा होता त्यांनी मला देखील खाण्याची विनंती केली. मी पण त्यांचा आग्रह डावलला नाही. अर्थातचं आधी नाही नाही म्हणत होतो पण त्या म्हंटल्या की " माझा नातु पण तुझ्या एवढाच आहे".
मी रमा, वृद्धत्व जरी आले असले तरी एक वारी न चुकवणारी मी, माझा नवऱ्याच १० वर्षांपूर्वीच निधन झालेलं. तेव्हापासुन माझ्या दोन मुलांचाच संसार ! मुले फारसे लक्ष देत नाही म्हणुन आपणही त्यांना सतत विचारपूस का करावी? अस मन नेहमी सांगतं. नातवंडे तशी अजून त्यांच्या आई बापावर नाही. अस म्हणतात, वृद्धांचे शेवटचे मित्र मैत्रीण ही त्यांचे नातवंडे असतात.
मी धनंजय म्हणजेचं तो मोठा मुलगा, शेतीकाम सर्व मीचं बघतो. शेती खर्च भरपुर होऊन जातो, निघणारा नफा मुलांच्या शिक्षणासाठी व आईसाठी राखून ठेवतो. शेतातील भाजीपाला घेऊन मार्केट मध्ये घेऊन जातो, योग्य त्या भावाने विकतो माझ्या नेहमी ठरलेल्या मित्राकडे जो की शेतीमालाची भरणी करून आठवडी बाजारात विकतो. तसा धूर्त आहे तो, मालाची तो जे म्हणतो त्याचं भावात खरेदी करवुन घेतो. तसे मार्केट मध्ये पण आणि बाजारात त्याचे लोकांसोबत चांगले संबंध नाही असं ऐकुन आहे.
|
Vegetables |
मी राकेश शेतीमालाची भरणी करून आठवडी बाजारात विकतो. मला कोणी शेतीमालाबाबत कमी जास्त भाव करण्याची बोलणी केलेलं बिलकुल आवडतं नाही.
अनेकदा माझी यावरून बाचाबाची झाली आहे. आजच एकाने मेथीची भाजीची जुडी १५ रुपये ने मागितली जी की 20 ने घेणं अपेक्षित होतं. मी पण म्हंटलं "नसेल घ्यायची तर पुढे जा उगाच गर्दी करू नका".
मी अरुण आजच त्या बाजारात माझे भांडण झाले, मध्यमवर्गीय कुटुंब आमचे काटकसर करुनच चालवावे लागते त्यात दोन्ही मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. मोठा मुलगा शुभम नाशिकमध्येच तर लहान मुलगा सागर पुण्यात शिकतो.
नमस्कार मी सागर माझा मोठा भाऊ नेहमी माझ्या सोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे राग राग करत असतो. नेहमीचं आमचे भांडणे होतात. पण माझे वडील मला प्रत्येक गोष्टींत खूप मदत करतात. प्रत्येक वेळी माझा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करतात.
तुमचा नाईलाज किंवा छंद देखील वाट चुकवण्यास मदत करत असतो. पहिली गोष्ट त्यात सागर निस्वार्थी मनाने प्रवासाला सुरवात करतो पण त्याला वाईट अनुभव येतो तो रमेश कडुन जेव्हा दुप्पट भाडे आकारण्यात येते.
पण नंतर जेव्हा बसमध्ये असताना रमा नावाच्या आजींसोबत एक गोड अनुभव त्याला येतो त्या जेव्हा त्याला त्यांच्या डब्यातील साबुदाण्याची खिचडी खायला देतात त्यात त्यांचे प्रेम आणि माया दिसुन येते.
अखेर सागर चे वडील अन भाऊ यांमध्ये सुध्दा त्याला प्रेम आणि क्रोध जाणवतोच.
अशाप्रकारे चांगले वाईट अनुभव यांची साखळी असतेच आयुष्यात !
आता प्रश्न असा देखील पडतो की जर योग्य रीतीने जगायचं ठरवलं किंवा अयोग्य रीतीने जगायचं ठरवलं तर जे काही अनुभवायचं आहे जे काही लिहिलेले असेल ते तर घडणारचं मग चांगलंच बनुन राहणे कुठं बंधनकारक आहे ? पण ज्याच्या आयुष्याची सुरवातच अयोग्य कर्माने झाली असेल त्याला अनुभव पण तसेच दिसत जातात.
इतरांच्या नजरेत तो त्याचा स्वभाव आधीच लिहुन टाकत असतो. इतरांच्या नजरेत त्याला बघण्याचा दृष्टिकोन देखील तसा होऊन जातो. निस्वार्थी लोक यांचे काही प्रमाणात साहाय्य पण करतात मात्र यांच्या आयुष्यात स्वार्थाचे अनुभव जास्त दिसुन येतात.
लेख -: अनिकेत कुंदे
खूप सुंदर मांडणी आहे...👌👌👍
ReplyDelete