स्टीव जॉब्स यांची माहिती | Steve Jobs Biography in Marathi
" हे जग तुम्हाला तेव्हाच महत्व देईल जेव्हा या जगाला तुम्ही तुमची क्षमता दाखवाल."
-- स्टीव जॉब्स
नमस्कार मित्रांनो,
आपल्यापैकी बर्याच जणांना ऍपल ( Apple ) ही जगप्रसिद्ध कंपनी तर माहिती असेलच, आपल्यातील बरेच लोक या कंपनीचे प्रॉडक्ट्स म्हणजेच फोन, लॅपटॉप, आयपॉड इ. गोष्टी सुद्धा वापरत असतील, तर या कंपनीचे असलेले सर्वेसर्वा, जगप्रसिद्ध उद्योगपती, या पृथ्वीतलावरील सर्व श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजेच, " ऍपल " कंपनीचे मालक " स्टीव जॉब्स " यांच्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
24 फेब्रुवारी 1955 रोजी अब्दुल जंदाली व जोना सिम्पसन या दाम्पत्याला कॅलिफोर्निया, अमेरिका येथे एक मुलगा झाला. आणि त्या मुलाचं नाव स्टिवन असं ठेवण्यात आलं, पण ह्या दोघांनाही हे मूलं नको होतं कारण त्या दोघांचा विवाह झाला नव्हता. जेव्हा स्टीवन यांचा जन्म झाला, त्यावेळी त्यांची आई जोना यांचं वय केवळ 21 वर्ष होतं व त्या महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या, त्यांचे वडील अब्दुल जंदाली हे खरोखरच खूप श्रीमंत होते, पण त्यांनी ह्या मुलाला सांभाळायला पूर्णपणे नकार दिला, त्यापेक्षा आपण या मुलाला कोणालातरी दत्तक देऊन टाकू असा सल्ला त्यांनी जोना यांना दिला. या सल्ल्यावर त्या दोघांचे एकमत झाले आणि शेवटी त्यांनी एका अडोप्शन सेंटर ला स्टीवन यांना दिले.
थोड्याच महिन्यांनी त्यांना पॉल जॉब्स आणि क्लारा जॉब्स या नवविवाहित दाम्पत्याने दत्तक घेतलं, हे दोघेही जास्त श्रीमंत तर नव्हते पण, स्टिव्हनला त्यांनी उत्तम शिक्षण देण्याचे ठरवले होते. स्टिव्हनचे पुढे स्टीव नाव त्यांनी ठेवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण क्यूपर्टीनो जूनियर हायस्कूल, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका इथे झाले.
1957 साली, पॉल जॉब्स आणि क्लारा यांनी पेट्रीसिया या मुलीला देखील दत्तक घेतले, आणि त्यांनी मोंटा लोमा, कॅलिफोर्निया इथे स्थलांतर केले. इथे स्टीव जॉब्स यांचे वडील हे लोकांच्या गाड्या दुरुस्त करायचे काम करत असे, स्टीव लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांना असे काम करताना बघून स्वतः ही त्यांची मदत करण्यासाठी जायचे. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार, चंचल त्याचबरोबर मस्तीखोर देखील होते.
अधिक वाचा : जॅक मा कोण आहेत? 'Chinese Businesss Magnet' होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता?
पुढील शिक्षणासाठी त्यांनी 1968 मध्ये होमस्टेड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, हायस्कूलमध्ये त्यांची बिल फर्नांडिस या एका मुलासोबत चांगली ओळख झाली आणि यानेच पुढे स्टीव वोजनियाक यांच्याशी स्टीव जॉब्सला ओळख करून दिली आणि याच दोघांनी मिळून पुढे जगप्रसिद्ध " ऍपल "( Apple ) कंपनीची सुरुवात केली.
1972 साली त्यांनी पोर्टलँड येथील रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, रीड महाविद्यालयाची फीस ही नक्कीच पॉल आणि क्लारा यांना परवडणारी नव्हती पण आपल्या मुलाला शिकवण्याचा त्यांनी जणू चंग बांधला होता, खूप कष्ट करून त्यांनी स्टीवला या महाविद्यालयात पाठवले. पण आपल्या घरची परिस्थिती बघून स्टीव यांना दुःख व्हायचे, आणि म्हणूनच आपल्या शिक्षणावर होणारा भरमसाठ खर्च बंद व्हावा यासाठी त्यांनी अवघ्या 6 महिन्यातच त्यांचे शिक्षण अर्धवट सोडले. कित्येक वेळा ते अमेरिकेतील इस्कॉन मंदिरात सुद्धा जेवण्यासाठी जात असे. विद्यालयीन शिक्षण जरी त्यांनी सोडले होते तरी, इतर आवडीच्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या, जसे की कॅलिग्राफी, इंग्रजीचे भाषेचे शिक्षण. इ.
दुर्दैवाने हे सर्व शिकत असताना त्यांना सिगारेटचे व्यसन सुद्धा लागले, त्यांच्या भविष्यासाठी ते खूपच अस्वस्थ असायचे, त्यांच्या जीवाला बिलकुल शांतता अशी नव्हती. आणि म्हणूनच त्यांनी धार्मिक ज्ञान, मनःशांती इत्यादी मिळवण्यासाठी भारतात यायचा निर्णय घेतला व ते भारतात आले सुद्धा. जून 1974 च्या आसपास ते आणि त्यांचा एक मित्र डॅनियल जो की पुढे जाऊन ऍपल कंपनीचा कर्मचारी बनला ते भारतात आले. अध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी काईंचीच्या " नीम करोली बाबा " यांना भेटण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने सप्टेंबर 1973 मध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॅनियल आणि स्टीव हे दोघे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बनारस,असे करत दिल्ली पर्यंत पोहोचले आणि इथे त्यांना एक हायदाखन नावाचे बाबा भेटले, त्यांच्याकडून स्टीव यांनी अध्यात्मिक शिक्षण घेतले, काही दिवस आश्रमात दीक्षा घेतल्यानंतर, मनःशांती मिळाल्यानंतर, जोशाने ते पुन्हा मायदेशी अमेरिकेत परतले.
अधिक वाचा : उद्योजकांचा जन्म - धीरूभाई अंबानी | Entrepreneur born - Dhirubhai Ambani
अमेरिकेमध्ये परतताच ते पुन्हा त्यांचे परममित्र स्टीव वोजनियाक यांना भेटले. सुरुवातीला या दोघांनी मिळून स्टीव जॉब्स यांच्या वडिलांच्या गॅरेजमध्ये एक व्हिडिओ गेमसाठी लागणारा सर्किट बॉक्स बनवला. 1975 येता येता अमेरिकेत संगणक लोकांना माहिती झाले होते व IBM ( International Business machines ) ही कंपनी जगात सर्वत्र कम्प्युटरचा प्रसार करत होती, त्याच बरोबर बिल गेट्स सुद्धा हळूहळू चर्चेत येऊ लागले होते आणि ते सुद्धा कम्प्युटरचे सॉफ्टवेअर विकायचे. तर ह्या दोन्ही कंपन्यांच्या एक पाऊल पुढे जायचा निश्चय या दोघांनी केला.
1976 साली वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी स्टीव जॉब्स आणि स्टीव वोजनियाक यांनी त्याच गॅरेज मध्ये " ऍपल " कंपनीची सुरुवात केली. थोडंसं खाल्लेलं सफरचंद हा या कंपनीचा लोगो बनला. ही कंपनी चालवण्यासाठी त्यांना भरपूर पैशाची गरज भासत होती आणि त्यांची पैशांची गरज ही त्यांच्या एका मित्राने पूर्ण केली ज्याचे नाव होते मार्क माकुला याला स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या चतुर्याने मनवले व कंपनीची एक तृथीयांश मालकी देऊ केली.
स्टीव जॉब्स तर स्वतः इंजिनियर नव्हते, संगणकासाठी लागणारे कोडींग, सॉफ्टवेअर हे सगळं स्टीव वोजनियाक बनवायचे पण प्रॉडक्टचे मार्केटिंग, जाहिरात, डिझाईन आणि लोकांना, ग्राहकांना आपल्याकडे वळवायचे महत्वाचे काम हे स्टीव जॉब्स करायचे.
सर्वप्रथम त्यांनी इंजिनियर व छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी संगणक बनवला, पहिला संगणक हा स्टीव वोजनियाक यांनी डिझाईन केला होता तर या संगणकाचे मार्केटिंग, फंडिंग आणि विकण्याचं काम हे स्टीव जॉब्स यांनी पाहिलं होतं.
बघता बघता स्टीव जॉब्स यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं, आधी खूपच बेजड, निरस आणि मोठा वाटणारा संगणक त्यांनी छोटा आणि आकर्षित बनवला. छोट्याश्या गोष्टीला सुद्धा अप्रतिम रीतीने मांडण्याची कला स्टीव जॉब्सकडे होती. कोणीही अगदी सहजरित्या संगणक वापरू शकेल असा हटके संगणक स्टीव जॉब्स यांना बनवायचा होता आणि त्यांनी तो तसा बनवला देखील. त्याच बरोबर त्यांनी या संगणकाला माऊस सुद्धा जोडला. आणि हे बघून चक्क बिल गेट्स सुद्धा थक्क झाले. अशा रीतीने Apple 1 आणि Apple 2 असे संगणकाचे दोन वर्जन त्यांनी बाजारात लॉन्च केले व बाजारामध्ये येताच या उत्पादनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आणि काहीच वर्षात स्टीव जॉब्स करोडपती झाले. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सर्वात तरुण वयात श्रीमंत झालेले स्टीव जॉब्स यांची दखल 'फोर्ब्स' ने देखील घेतली.
त्यांना या कंपनीला अजून उंचावर न्यायचे होते म्हणून त्यांनी त्यावेळच्या एका मोठी कंपनी असलेल्या पेप्सीकोला ( Pepsi Cola ) चे सीईओ असलेले जॉन स्कली यांना आपल्या कंपनीत येण्यास भाग पाडले. आणि थोड्याच महिन्यांनी त्यांचा हा निर्णय स्वतःला चुकीचा वाटू लागला, कारण संगणकाच्या सॉफ्टवेअर बनवण्यावरून या दोघांमध्ये वाद विवाद होऊ लागले. स्टीव जॉब्स यांना ऍपल कंपनीचा संगणक हा क्लोज सिस्टीम मध्ये हवा होता तर जॉन यांना ओपन सिस्टीम मध्ये हवा होता. याचबरोबर पुढे एका संगणकाच्या प्रक्षेपणाच्या वेळीसुद्धा मंचावर स्टीव जॉब्स यांनी इतर कर्मचारी सहकाऱ्यांचे नाव घेतले नाही. त्याचबरोबर स्टीव यांचे गर्विष्ठ वागणे कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना देखील पटत नव्हते. आणि हा वाद पुढे इतका वाढला की स्वतःच्याच कंपनीमधून स्टीव जॉब्स यांना हाकलण्यात आले.
स्टीव यांनी सुद्धा बाहेर येताच 1985 साली त्यांची नवीन " Next " नावाची कंपनी चालू केली. या कंपनीमध्ये ते संगणकाचे सॉफ्टवेअर, हार्डवेअर बनवू लागले. आणि बघता बघता त्यांनी ही कंपनी सुद्धा नावारूपाला आणली.
पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा जॉब्स यांनी Lucasfilm नावाची ऍनिमेशन आणि कार्टून बनवणारी कंपनी 1986 रोजी जॉर्ज लुकास यांच्या कडून 50 मिलियन डॉलरला विकत घेतली व तिचे नवीन नाव Pixar असे ठेवण्यात आले. या कंपनीने स्टीव यांना भयंकर पैसा मिळवून दिला. 1995 साली या कंपनीने बनवलेल्या Toy Story या चित्रपटाने संपूर्ण विश्वात धुमाकूळ घातला आणि स्टीव्ह हे पुन्हा एकदा अरबपती झाले.
अधिक वाचा : Rich Dad Poor Dad Marathi Summary | रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश
पण इकडे मात्र ऍपल कंपनीची वाताहत चालू झाली होती. स्टीव कंपनी सोडून गेल्यानंतर ही कंपनी पूर्णपणे तोट्यात गेली, जणू काही कंपनीला श्राप लागला आहे आणि ही कंपनी तोपर्यंत खाली जात राहिली जोपर्यंत स्टीव जॉब्स कंपनीमध्ये परत रुजू झाले नाहीत.
अखेर 1997 साली ऍपल कंपनीने पुन्हा एकदा स्टीव जॉब्स कडे धाव घेतली आणि CEO बनवून कंपनीला वाचवण्यासाठी हात जोडले. स्टीव जॉब्स जेव्हा ऍपल मध्ये परत रुजू झाले तेव्हा त्यांनी पाहिले की ऍपल कंपनी 200 ते 300 प्रॉडक्ट बनवत होती. त्यांनी लगेच ही गोष्ट थांबवली व फक्त 8 ते 10 उत्पादनांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी कम्प्यूटरची डिझाईन, मार्केटिंग, आणि पॅकेजिंग इत्यादींमध्ये अमूलाग्र बदल केले. त्यांनी संगणक अधिक आकर्षित बनवून पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. बघता बघता कंपनी रुळावर आणण्यात त्यांना यश आले, कंप्युटर शिवाय त्यांनी ऑक्टोबर 2001 साली पोर्टेबल Ipod बाजारात आणले. " 1000 गाणी तुमच्या खिशात " अशी याची टॅगलाईन होती. पुढे जून 2006 मध्ये त्यांनी कंपनीचे मॅकबुक लाँच केले, आणि 29 जून 2007 साली कंपनीने पहिला iphone बाजारात आणला, iphone ने कमालीची प्रसिद्धी मिळवली आणि ऍपल कंपनीने विश्वात आपला डंका वाजवला, इथून पुढे स्टीव जॉब्स यांनी मागे वळून कधी बघितलंच नाही.
स्टीव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 18 मार्च 1991 साली त्यांचा विवाह लॉरेन यांच्यासोबत झाला त्यानंतर त्यांना तीन मुले देखील झाली. क्रीसनॅन या त्यांच्या पहिल्या गर्लफ्रेंडकडून सुद्धा त्यांना एक मुलगी झाली होती जिचे नाव लिसा जॉब्स असे होते.
2003 साली त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग आहे असे निदान झाले होते, पण कंपनीचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. 2010 नंतर त्यांनी कंपनीची जबाबदारी " टीम कूक " यांच्यावर सोपवली आणि कंपनीतून कायमची निवृत्ती घेतली. त्यांचा हा आजार अधिकच बळवत गेला आणि अखेर 5 ऑक्टोबर 2011 साली एक अत्यंत हुशार, जिद्दी आणि चिकाटी असलेल्या या उद्योगपतीचा वयाच्या 56 व्या वर्षी मृत्यू झाला.
वडिलांच्या छोट्याशा गॅरेज मधून सुरु केलेली कंपनी ते जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक, जिचे मूल्य आज जवळपास 2 लाख करोडपेक्षा अधिक आहे हा प्रवास नक्कीच थक्क करणारा होता. " दुनिया झुकती है, बस्स झुकाने वाला चाहिए " या उक्तीला सार्थ ठरलेले "स्टीव जॉब्स यांची माहिती | Steve Jobs Biography in Marathi" तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.