भगतसिंग यांची माहिती | Bhagat Singh Information in Marathi
कितनोंको चढायाथा फाँसी पर,
कितनोने गोलियाँ खायी थी,
तो फिर क्यूँ झूठ बोलते हो जनाब,
के चरखे से आजादी आयी थी !!
साहस, त्याग, समर्पण, निष्ठा, क्रांतिकारी, क्रांतिवीर, अशी कित्येक विशेषणे ज्यांच्यासमोर फिकी पडतील, फक्त 23 वर्षांचे आयुष्य ते सुद्धा फक्त देशसेवेसाठी ज्यांनी अर्पण केलं, ज्या वयात आज देशातील बरीच मुलं ही गुलाबाचं फुलं घेऊन मुलीच्या मागे लागलेले दिसतात, त्या वयात या क्रांतिवीरांनी फाशीची दोरी हसत हसत गळ्यात लटकवली होती. ज्यांचं नाव आहे भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू. त्यातीलच एक म्हणजे या भारतीय भूमिला लाभलेले वीरसुपुत्र," शहीद भगतसिंग ( shaheed bhagat singh)". तर मित्रांनो आज आपण वीर शहीद भगतसिंग यांच्या जीवनाबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत.
भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी जिल्हा लायलपूर, पंजाब येथील एका शीख परिवारात झाला होता. लायलपूर आजच्या पाकिस्तानात स्थित आहे. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग तर आईचे नाव विद्यावती होते. त्यांचे वडील आणि काका हे सुद्धा क्रांतिकारी विचारांचे होते. ज्या दिवशी भगतसिंग यांचा जन्म झाला त्याच दिवशी त्यांच्या दोन्ही काकांना ब्रिटिश सरकारने जेल मधून सोडले होते.
दयानंद वेदिक हायस्कुल येथून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच ते अभ्यासात अत्यंत हुशार आणि तीव्र होते. त्यांना वाचनाचे भयंकर वेड होते. ते जेव्हा सुद्धा लोकांच्या नजरेस पडायचे तेव्हा प्रत्येकवेळी त्यांच्या हातात एक तरी पुस्तक दिसत असे.
13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग येथील निष्पाप आणि शांतीपूर्ण आंदोलकांवर जनरल डायर ने गोळ्या झाडल्या ज्यामध्ये तब्बल एक हजार हून अधिक लोकांचा जीव गेला. ही गोष्ट 13 वर्षांच्या भगतसिंगला समजली, एकेदिवशी शाळेतून थेट ते जालीयनवाला बाग हत्याकांड जिथे झाला तिथे पोहचले. तेथील माती त्यांनी त्यांच्या बाटली मध्ये भरली व उशिरा रात्री घरी आले. आणि आईला ती बाटली देऊन म्हणाले की " ह्या बाटली मध्ये आपल्या लोकांची माती आहे, हीला रोज पुजायला हवं ". 13 वर्षांच्या भगतला असं बोलताना पाहून आईला कळून चुकलं होतं की हा सुद्धा बाप-चुलत्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्यासारखाच क्रांतिकारी होईल.
जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ गांधीजींनी असहकार आंदोलनाला सुरुवात केली. आणि ह्या आंदोलनामुळे सर्वात जास्त आनंद भगतसिंग यांना झाला होता. कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की स्वातंत्र्य हे मिळणारच आहे. पण 4 फेब्रुवारी 1922 रोजी या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं, आणि चौरिचौरा येथे संतप्त नागरिकांनी ब्रिटिश पोलीस चौकीलाच आग लावली ज्यामध्ये 22 ब्रिटिश पोलिसांचा जळून होरपळून मृत्यू झाला. ह्या घटनेमुळे गांधीजी तीव्र संतापले व त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
लाखो भारतीयांबरोबरच भगतसिंग यांना सुद्धा फार दुःख झाले, जर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले नसते तर भारताला खूप अगोदरच स्वातंत्र्य मिळालं असतं.
भगतसिंग सुखदेव राजगुरू | bhagat singh rajguru sukhdev
१९२३ मध्ये त्यांनी लाहोर नॅशनल कॉलेज या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अहिंसेच्या मार्गांवर चालणाऱ्या गांधीजींच्या अगदी विरुद्ध भगत सिंग यांचे विचार होते, आणि त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. हळू हळू त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घ्यायला सुरुवात केली. मार्च 1926 मध्ये त्यांनी नवजवान भारत सभाची स्थापना केली व हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. याच दरम्यान त्यांची ओळख चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू व इतर क्रांतिकारींसोबत झाली.
पुढे 30 ऑक्टोबर 1928 रोजी जुलमी सायमन कमिशनच्या निषेधार्थ लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली, या मध्ये भगतसिंग यांनी सुद्धा सहभाग घेतला, तर या आंदोलनाचे नेतृत्व हे लाला लजपतराय करत होते. याच वेळेस पोलिसांनी आंदोलकांवर अचानक लाठीचार्ज सुरू केला ज्यामध्ये " लाला लजपतराय " गंभीर जखमी झाले व काहीच दिवसांनी त्यांचा यामुळेच मृत्यू देखील झाला.
या घटनेमुळे भगतसिंग व त्यांचे इतर साथीदार चवताळून उठले व त्यांनी इंग्रज सरकारला धडा शिकवण्याचा चंग बांधला. या लाठीचार्जच्या मागे असलेल्या ब्रिटिश पोलीस अधिकारी " जेम्स स्कॉट " याला मारण्याचा प्लॅन चंद्रशेखर आझाद , भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी बनवला.
दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे 17 डिसेंबर 1928 च्या सायंकाळी सव्वा चारच्या दरम्यान, लाहोर, पंजाब येथे शिवराम, राजगुरु,भगतसिंग, सुखदेव,चंद्रशेखर आझाद हे पोलीस स्टेशनच्या बाहेर जेम्स स्कॉटची वाट पाहू लागले, आणि थोड्याच वेळात एक पोलीस अधिकारी "जॉन सौंडर्स " हा बाहेर पडताना दिसला, हा सुद्धा तितकाच क्रूर होता व क्षणाचाही विलंब न करता राजगुरू आणि भगतसिंग यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या व तेथून पळ काढला, हे पाहताच एक भारतीय शिपाई चंद्रशेखर आझाद यांच्या मागे पळू लागला, नाईलाजाने त्याला सुद्धा ठार करावे लागले. अशाप्रकारे भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला तर घेतला पण आता ब्रिटिश सरकार अगदी हात धुवून या सगळ्यांच्या मागे लागलं होतं.
या घटनेनंतरच भगतसिंग यांनी आपली केसं व दाढी कापली जेणेकरून त्यांना कोणीही ओळखू नये व वेशांतर करून हे सर्व सुखरूप लाहोर मधून बाहेर पडले.
ब्रिटिश सरकारला भारतीय कामगार, व्यावसायिक आणि गरीब लोकांबद्दल थोडीसुद्धा आत्मीयता नव्हती, त्यांना फक्त भारताला लुबाडायचं होतं आणि राज्य करायचं होतं .1929 साली ब्रिटिश सरकार एक नवीन कायदा ( बिल ) घेऊन आलं, ज्यामध्ये अनेक क्रूर कायदे कानून होते, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला अर्धी सत्ता द्यायला ब्रिटिश सरकार तयार झाले होते, पण हे भगत सिंग व अनेक क्रांतिवीरांना मान्य नव्हतं कारण त्यांना " पूर्ण स्वराज्य " हवं होतं.
या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी एक मीटिंग घेण्यात येणार होती आणि याची भनक भगतसिंग व त्यांच्या दलाला लागली, आणि याचाच निषेध दर्शवण्यासाठी 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या केंद्रीय संसद भवनात भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकले, पण यावेळी कोणाचीही हिंसा करण्याचा त्यांचा मुळीच हेतू नव्हता, आणि म्हणूनच जाणून-बुजून कमी विस्फोटक असलेले बॉम्ब बनवण्यात आले होते.
बॉम्ब टाकल्यावर भगतसिंग म्हणाले की " बेहरो को जगाने के लिए धमाका जरुरी है " व त्यांनी तिथून पळून न जाता आत्मसमर्पण केलं. " इन्कलाब जिंदाबाद " च्या नाऱ्यांनी अवघे संसद भवन दुमदुमू लागले.
यानंतर ज्या जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलं तिथे ब्रिटिश सरकार भारतीय व इंग्रज आरोपींमध्ये प्रचंड भेदभाव करत होते. वर्षानुवर्ष न धुतलेले कपडे घालायला देणे, बाथरूमच्या अगदीच बाजूला असलेले स्वयंपाक घर, व अन्नाला उंदीर, झुरळ खात आहेत हे सर्व भगतसिंग यांनी बघितले व जोपर्यंत या सर्व गोष्टी बदलत नाहीत तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला.
आणि इथूनच त्यांच्यावर इंग्रजांनी भयंकर अत्याचार करायला सुरुवात केली, बर्फाच्या लादीवर झोपवून मारहाण करणे असो किंवा मग हात पाय बांधून मारणे असो, क्रूरतेच्या सर्व सीमा ब्रिटिशांनी पार केल्या.
ह्यांनी कसतरी जिवंत रहावं म्हणून ब्रिटिशांनी नाकातोंडांतून जबरदस्ती दूध पाजायला सुरुवात केली. पण भगतसिंग यांनी शेवटपर्यंत आपलं उपोषण सोडलं नाही. एक दोन नाही तर तब्बल 97 दिवस भगतसिंग व बटूकेश्वर दत्त यांनी उपोषण केले आणि अखेर ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडलं. व त्यांच्या अटी शेवटी इंग्रजांना मान्य कराव्या लागल्या. पण महान स्वातंत्र्यसेनानी " जतींद्रनाथ दास " यांचा या उपोषणादरम्यान मृत्यू झाला.
अधिक वाचा : बिपिन चंद्र पाल : Bipin Chandra Pal Information in Marathi
काहीच दिवसांनी भगतसिंग यांचे लाहोरच्या तुरुंगात स्थलांतर करण्यात आले. जिथे अगोदरच सुखदेव, राजगुरू आणि इतर लोकांना बंधिस्त केलं होतं.
भगतसिंग फाशी
या दरम्यान त्यांची केस कोर्टात चालू होती, काहीही करून भगतसिंग यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून इंग्रजांनी प्रत्येक हातखंडे वापरायला सुरुवात केली. अनेक खोटे साक्षीदार आणले गेले. त्याचबरोबर भगत सिंग यांच्या गटातील काही लोकांनीच गद्दारी केली व स्वतः माफीचे साक्षीदार बनून आपल्यांविरुद्धच साक्ष दिली ,आणि इथेच सर्व खेळ पालटला. जय गोपाल, हंस राज बोहरा, मनमोहन बॅनर्जी, फोनिंदरनाथ गोष ही त्या प्रमुख देशद्रोहींची नाव आहेत. यासोबतच अजून 450 ते 500 जणांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याविरोधात साक्ष दिली.
अखेर 7 ऑक्टोबर 1930 साली ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली.
24 मार्च 1931 ला सकाळी त्यांना फाशी देण्यात येणार होती, पण या बातमीमुळे सर्वसामान्य माणसात प्रचंड आक्रोश द्वेष पसरला होता आणि म्हणून अचानक 23 मार्च 1931 च्या सायंकाळीच त्यांना फाशी देण्याचे ठरवले.
जेव्हा या तिघांना हे सांगण्यात आले, तेव्हा एक वेगळंच हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं, हसत हसत त्यांनी फाशी घर गाठलं, इन्कलाब जिंदाबादचे नारे तुरुंगातील शांतता भंग करत होते. यानंतर त्यांनी एक गाणं गायलं ते म्हणजे...
" कभी वो भी दिन आयेगा के आजाद होंगे हम,
ये अपनी जमीं होगी ये अपना आसमा होगा!
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बार मेले,
वतन पर मरने वालों का यहीं नामो-निशान होगा !!
तिघांनी एकमेकांना "आलिंगन दिलं, फाशीच्या दोरीचं चुंबन घेऊन ती गळ्यात लटकवली, आणि अनंतकाळासाठी खऱ्या अर्थाने अमर झाले. मरणानंतर सुध्दा निर्दयी इंग्रजांनी त्यांच्या देहाचे तुकडे केले, व सतलज नदीच्या किनाऱ्यावर फेकून दिले, ही बातमी लोकांना समजली आणि त्यानंतर लोकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
22-23 वर्षांच्या या तरुण क्रांतिवीरांनी ते करून दाखवलं जे कोणालाही जमलं नव्हतं, या नंतर खऱ्या अर्थाने प्रत्येक देशवासियाला स्वातंत्र्याप्रतीची प्रेरणा मिळाली व जोमाने हा लढा सुरु ठेवण्याची जिद्द सुद्धा मिळाली. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.
समस्त भारतीयांकडून भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांनाही कोटी कोटी प्रणाम.
जय हिंद, जय भारत!!
"भगतसिंग यांची माहिती | Bhagat Singh Information in Marathi" वाचल्याबद्दल धन्यवाद!!