बहिर्जी नाईक यांची माहिती | bahirji naik information in marathi
बहिर्जी नाईक यांची माहिती | bahirji naik information in marathi नमस्कार मित्रांनो,
शेकडो वर्षे परकीय इस्लामिक आक्रमणकाऱ्यांनी आपल्या देशाला, हिंदू धर्माला, येथील संस्कृतीला आणि जनतेला अमाप त्रास दिला. अशा वेळेस स्वतःचा स्वाभिमान गुंडाळून बऱ्याच हिंदू राजांनी मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं होतं, ज्यावेळेस मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, जंजिऱ्याचे सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या हिंद भूमीवर थयथया नाचत होते, त्यावेळेस स्वतःचं आणि रयतेचं हिंदवी स्वराज्य निर्माण करून या सल्तनतींना भलं मोठं खिंडार पाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मराठ्या मावळ्यांनी केलं.
अठरा-पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी प्रत्येक मावळ्यामध्ये असा देशाभिमान जागवला, की प्रत्येक मावळा छत्रपती शिवरायांसाठी आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी पुढे यायचा. जगातला एकमेव असा काळ ज्यावेळेस लोकं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा करू लागले. छत्रपतींच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न हे त्यांच्या निष्ठावान मावळ्यांनी सत्यामध्ये उतरवलं. ज्यामध्ये बऱ्याच रणधुरंदर मर्द मावळ्यांची नावे येतात, जसे की तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, रामजी पांगेरा, शिवा काशीद, नेताजी पालकर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, हंबीरराव मोहिते आणि अशा अनेक मावळ्यांची नावे इतिहासात अजरामर झालेली आहेत.
हे पण वाचा: हिरोजी इंदुलकर कोण होते? । रायगड बांधणीचा इतिहास काय आहे? जाणून घ्या!
परंतु आज आपण एका अशा मावळ्या बद्दल जाणून घेणार आहोत, जो छत्रपती शिवरायांचा गुप्त आधारस्तंभ होता, छत्रपती शिवराय हे साक्षात शिवाचं रूप तर त्यांचा तिसरा नेत्र म्हणून या मावळ्याची ओळख होती. शत्रूच्या गोठातली माहिती आणून वेळेच्या आधी शिवरायांपर्यंत पोहोचवणारा, निष्णात बहुरूप्या, अनेक युद्ध कलांचे ज्ञान असणारा, शिवरायांचा सवंगडी, हिंदवी स्वराज्याचा पहिला गुप्तहेर प्रमुख, एकमेव आणि अद्वितीय “ बहिर्जी नाईक " .
बहिर्जी नाईक यांचे हिंदवी स्वराज्यातील योगदान लाख मोलाच आहे. तरीसुद्धा इतिहासाला यांच्या बद्दल फारशी माहिती नाही. आजच्या या लेखामध्ये आपण या मावळ्याच्या पराक्रमाचा मागोसा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बहिर्जी नाईक यांचा जन्म आणि बालपण :-
बहिर्जी नाईक यांच्या बद्दल इतिहासाला फारच दुर्मिळ माहिती आहे. तरीसुद्धा असं म्हटलं जातं की, बहिर्जी नाईक हे एका गरीब रामोशी कुटुंबात जन्माला आले होते. लहानपणापासूनच खेळकर आणि खोडकर असलेले बहिर्जी नाईक गावातील बारा बलुतेदार यांच्या कामाचे निरीक्षण करायचे. ते स्वतः सुद्धा आपल्याला ते काम जमतय का याचं परीक्षण करायचे.
गावामध्ये येणारे भिकारी, गोंधळी, वैरागी, साधुसंत, वाळा मनगटावाले खेळणी वाले, इत्यादी जे कोणी येतील त्यांचं बारीक निरीक्षण बहिर्जी करायचे. त्यांचे हुबेहूब आवाज काढणे हा त्यांचा छंद झाला होता. अशा विविध लोकांचे पोशाख घालून लोकांचे गमतीशीर भविष्य सांगायचे. पण नियतीने त्यांचं भविष्य साफ लिहून ठेवलं होतं, हे कदाचित त्यांनाही माहिती नव्हतं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब जेव्हा पुण्यामध्ये राहायला आले, तेव्हा जनता दुष्काळामुळे आणि परकीय आक्रमणामुळे बेहाल झाली होती. लोकांनी राहायला यावं म्हणून आऊसाहेबांनी जो कोणी आसपासच्या जंगलातील माजलेला लांडगा मारेल त्याच शिवरायांच्या हस्ते सोन्याचे कडे दिले जाईल, असे फर्मान काढले. ही बातमी जेव्हा बहिर्जींना समजली तेव्हा त्यांनी माजलेल्या लांडग्याची शिकार करायचे ठरवले.
लांडग्याची शिकार करणे बहिर्जींच्या डाव्या हाताचा खेळ, एका पिसाळलेल्या लांडग्याची शेपूट कापून बहिर्जी थेट शिवनेरीवर पोहोचले. लांडग्यांची शेपूट त्यांनी जिजाऊंना दाखवली, पण त्यावेळेस शिवराय तेथे उपस्थित नव्हते. जिजाऊंनी सोन्याचे कडे घेऊन जा असे बहिर्जींना सांगितले, परंतु बहिर्जींनी शिवरायांना भेटायचा हट्ट धरला. तेव्हा जिजाऊ म्हणाल्या की शिवराय हे सवंगड्यांसोबत जंगलामध्ये खेळत असतील, तू जाऊन त्यांना शोध!
हे पण वाचा: राजमाता जिजाऊ जयंती विशेष | Rajmata Jijau Jayanti - 12 January 2024
जंगलामध्ये शोधत असताना, कोणीतरी आलेलं आहे याची खबर देण्यासाठी, महाराजांच्या एका मित्राने मोराचा आवाज काढायला सुरुवात केली. आवाज ऐकताच शिवराय आणि त्यांचे सवंगडी त्या दिशेने चालत आले. मुलांचा घोळका बघून बहिर्जी म्हणाले की तुमच्यातले शिवाजी राजे कोण आहेत ? यावर शिवराय पुढे येऊन म्हणाले की मी आहे शिवबा.. तू कोण? आणि काय काम आहे? यावर बहिर्जी नाईक म्हणाले राजे मुजरा तुम्हाला, मी लांडगा मारून आलोय आऊसाहेबांनी सोन्याचं कडं दिलं, पण मला तुम्हाला एकदा भेटायचं होतं. महाराज मी सुद्धा तुमच्यासोबत खेळू शकतो का ? यावर शिवरायांनी विचारले की तुला काय काय येतं? यावर बहिर्जी म्हणाले तलवारबाजी, कुस्ती, विविध प्राणी पक्षी यांचे मी हुबेहूब आवाज काढू शकतो. त्याचबरोबर मी आल्यावर जो मोराचा आवाज आला, तो मोर नसून एक मुलगा झाडावरुन तुम्हाला सावध करत होता, आणि मी येताच तुम्ही तुमच्या तलवारी जाळ्यामध्ये लपवून ठेवल्या. मोर वैशाखात ओरडत नाही हे त्या मुलाला सांगून ठेवा. महाराज हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले वा... बहिर्जी ठीक आहे, आजपासून तू आमचा सवंगडी..!!
या गोष्टींनंतर बहिर्जी आणि महाराजांची चांगली गट्टी जमली. बहिर्जीनी महाराजांना जंगलातील विविध रानवाटा, प्राणी, झाडे झुडपे, डोंगर, दऱ्या, इत्यादीची माहिती दिली. महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरात जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळेस बहिर्जी नाईक सुद्धा तेथे उपस्थित होते.
बहिर्जी नाईक यांचे स्वराज्यातील योगदान :-
स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यापासून ते महाराजांच्या निधनापर्यंत बहिर्जी नाईक हे हिंदवी स्वराज्याची सेवा करत होते. कुठलेही वेशांतर बहिर्जी नाईक यांना सहज करता येत असे. जसे की कोळी, शेतकरी, भिकारी, सुफी, संत, फकीर, गोंधळी, जोगत्या इत्यादी.
शत्रूच्या गोठात जाऊन आपल्याला हवी असलेली माहिती नकळत कशी काढून घ्यायची हे बहिर्जींना चांगलंच ठाऊक असायच. एवढेच काय तर चक्क विजापूरचा आदिलशाही दरबारात आणि आग्र्याच्या मुघल दरबारात बहिर्जी नाईक हे वेशांतर करून जात. असे करताना पकडले गेल्यास याची शिक्षा फक्त “ मौत " हे ठाऊक असून सुद्धा बहिर्जी यांनी जीवावर उदार होऊन हे कार्य बऱ्याच वेळा निभावलं. हे केवळ असामान्य कर्तृत्व बहिर्जींकडेच होतं.
स्वराज्यातील गुप्तहेर खात्याचे नियम हे खूपच कडक होते त्यामुळे जर एखाद्याने आणलेली माहिती ही खोटी निघाली तर त्याचा कडेलोट केला जाई. त्यामुळे स्वराज्याचं गुप्तहेर खातं हे चोख कामगिरी बजावत असत. एवढेच नाही तर बहिर्जी नाईक यांनी या गुप्तहेर खात्यासाठी एक सांकेतिक भाषा देखील बनवली होती. जी केवळ त्या खात्यातील हेरांनाच समजू शकत होती. त्यामुळे कुठलीही खबर बाहेर जायचा प्रश्नच येतं नसत.
बहिर्जी नाईकांच वेषांतर एवढं जबरदस्त असायचं की स्वराज्यातील मावळ्यांना सुद्धा ते ओळखता येत नसे. फक्त छत्रपती शिवराय हे बहिर्जी नाईकांना ओळखायचे. असे असून सुद्धा बहिर्जी नाईक हे दांडपट्टा आणि तलवारबाजी मध्ये निपुण होते. कारण शत्रूच्या गोटात असल्यामुळे बऱ्याचदा जीवावर बेतण्याचा प्रसंग हा निर्माण होऊ शकतो. बऱ्याचवेळा अटीतटीच्या प्रसंगामध्ये बहिर्जींनी हे कसब वापरून स्वतःचे प्राण वाचवून शत्रूला धूळ चारली होती.
काही निवडक प्रसंग :-
1) जेंव्हा पुरंदरासह महाराजांना 23 किल्ले प्रदान करावे लागले आणि मिर्झाराजे जयसिंग ला दिलेल्या शब्दामुळे महाराजांना आग्र्याला बादशहाच्या भेटीसाठी जावे लागले होते. त्यावेळेस बहिर्जींच्या सांगण्यावरून गुप्तहेर खातं आणि स्वतः बहिर्जी नाईक हे काही दिवस आधीच आग्र्याला दाखल झाले होते. तब्बल 400 ते 500 हेर हे त्यावेळेस वेशांतर करून आग्र्यामध्ये फिरत होते. कोणी चपला शिवणारा, कोणी मडकी घडवणारा, तर कोणी भिकारी असं वेशांतर केलं होतं.
शत्रूच्या गोठातली आणि आग्र्याच्या दरबारातली इत्यंभूत माहिती छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचत होती. त्याचबरोबर शिवाजी राजांकडे खूप ताकद आहे, ते अचानक गायब होऊ शकतात, जादू टोणा ही त्यांना येतो अशी अफ़वा आग्र्यामध्ये बहिर्जी नाईक यांनी पसरवून शत्रू सेनेचं आणि तेथील लोकांचं मानसिक खच्चीकरण केलं होतं.
यानंतर बादशहाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवराय सुटले आणि सुखरूप रायगडावर परतले. शिवरायांचा एकही मावळा बादशहाच्या हाताला लागला नाही यामध्ये सर्वात मोलाच योगदान हे बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याचं होतं. यानंतर छत्रपती शिवाजी हे नाव संपूर्ण भारतामध्ये दुमदुमलं.
2) 1659 मध्ये जेव्हा विजापूरच्या दरबारातला बलाढ्य सरदार अफजल खान हा भलं मोठं सैन्य घेऊन छत्रपती शिवरायांना मारायला निघाला होता. स्वराज्यावर आलेलं हे भलं मोठं संकट बहिर्जींनी हेरलं होतं, आणि अफजल खान विजापूर वरून निघाल्यापासून ते पोहोचेपर्यंत सर्व माहिती शिवरायांपर्यंत बहिर्जी नाईक यांनी पोहोचवली.
अफजलखानाकडे किती सैन्य आहे, किती हत्ती,किती घोडे, त्याचबरोबर अफजल खान दिसतो कसा त्याची उंची,शरीरयष्टी कशी आहे, त्याच्या जवळची लोकं किती आहेत, खानाच्या सवयी, त्याची दिनचर्या, इत्यादी सर्व छोटी-मोठी माहिती बहिर्जी नाईक यांनी महाराजांना दिली. अफजल खान हा कपटी असून महाराजांना ठार मारायला आलेला आहे हा महत्त्वाचा निरोप सुद्धा बहिर्जींनी पोहोचवला. आणि यामुळेच अफजलखानाच्या भेटीवेळी महाराज हे अत्यंत सावध होते आणि तयार होते.
खचलेल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी महाराजांनी आपल्याला भवानी आईने तलवार दिलेली आहे अशी अफवा पसरवली आणि ही बातमी सर्व सैन्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवायचं काम बहिर्जी नाईक यांनी केलं.
प्रत्यक्ष भेटीवळी खानानं चिलखत घातलेलं नाही त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेला सरदार सय्यद बंडा हा खूपच धोकादायक आहे हे देखील महाराजांना बहिर्जींनी सांगितलं होतं. या सर्व माहितीमुळेच महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहास घडवला.
3) यानंतर शाहिस्तेखान जेव्हा एक लाखाचं सैन्य घेऊन महाराजांच्या पुण्यात ठाण मांडून बसला होता अशा वेळेस शाहिस्तेखान रहात असलेल्या लाल महालात वेशांतर करून बहिर्जी नाईक आत शिरले. शिवरायांचे बालपण लाल महालात गेल्यामुळे शिवरायांना लाल महाला बद्दल माहिती होतीच परंतु शाहिस्तेखानाने त्याच्यावर कब्जा केल्यानंतर आतील बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. आणि याची अचूक माहिती बहिर्जी नाईक यांनी आत घुसून शोधून काढली, शाहिस्तेखानाच्या जनान खाण्यापासून ते त्याच्या खोलीपर्यंतची माहिती बहिर्जी नाईकांनी महाराजांना दिली.
वेळोवेळी जीवावर उदार होऊन वेशांतर करून बहिर्जी नाईक हे लाल महालात फिरत असत. भटार खाण्यापासून ते जनान खाण्यात जाणारा रस्ता हा कच्च्या विटांनी बांधलेला आहे की माहिती महाराजांना देणारे बहिर्जी नाईक होते. म्हणूनच एक लाखाची फौज असून देखील महाराज लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं छाटण्यात यशस्वी झाले.
यानंतर पन्हाळ्यावरून महाराजांना सुखरुप विशाळगडापर्यंत पोहोचवणारे, वाट दाखवणारे हे बहिर्जी नाईक होते. उंबरखिंडीमध्ये केलेला कार्तलाब खानाचा पराभव, सुरतेवर 2 वेळा छापा, बुऱ्हानपूरची लूट , रामसेसची झुंज, जंजिऱ्याची मोहीम, अशा अमाप लढायांमध्ये बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने छत्रपती शिवरायांना आणि पुढे संभाजी राजांना मदत केली होती.
बहिर्जी नाईकांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदाच सुरत वखारीच्या जॉर्ज ऑक्सिजन्टन या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना ओळखले होते. त्या वखारीच्या समोर भिकाऱ्याचा वेश धारण करून त्या वखारीची संपूर्ण माहिती महाराजांना पोहोचवणारे दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी नाईक होते.
छत्रपती शिवाजी महाराजचं नाहीत तर पुढे छत्रपती संभाजी महाराजांना देखील अनेक लढायांमध्ये बहिर्जी नाईक यांनी मोलाची मदत केली. आजही अभिमानाने आपण म्हणतो की जर बहिर्जी नाईक जिवंत असते तर छत्रपती संभाजी राजांना कधीच पकडण्यात मुकर्रबखान आणि औरंगजेब यशस्वी झाला नसता.
आजन्म ज्यांनी स्वराज्याची नितांत निस्वार्थ सेवा केली, आपला संसार त्यागला, गाव सोडलं, घरदार सोडलं फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांना देव मानून त्या देवाची सेवा केली आणि हे हिंदवी स्वराज्य उभं करण्यात मोलाची कामगिरी बजावली अशा महाराजांच्या या रणधुरंदर वीर शिलेदारास महाराष्ट्राचा मानाचा मुजरा.
जय भवानी, जय शिवाजी!
धन्यवाद "बहिर्जी नाईक यांची माहिती | bahirji naik information in marathi" वाचल्याबद्दल !!